कणकवली : कोकण रेल्वे मार्गावर राजापूर ते वैभववाडी स्थानक दरम्यान शेर्पे येथे कोवीड - १९ पार्सल ट्रेन रूळावर असलेल्या ट्रॉलीला धडकली . त्यामुळे रेल्वे इंजिनचे मोठे नुकसान झाले . तर केरळकडे जाणाऱ्या रेल्वे पार्सल गाडीला तीन तासाचा विलंब झाला . रेल्वे विद्युतीकरणाचा ठेका घेतलेल्या कंपनीच्या बेजबाबदारपणामुळे हा अपघात झाल्याचे प्रथमदर्शनी दिसून येत आहे . बुधवारी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली .कोरोना प्रादुर्भावामुळे कोकण रेल्वे मार्गावरील प्रवासी वाहतूक सेवा बंद आहे . तर अत्यावश्यक साहित्य , औषधे वाहून नेणारी पार्सल ट्रेन सुरू करण्यात आली आहे . याचाच एक भाग म्हणून मंगळवारी ओखा येथून ००९३३ ओखा - तिरूअनंतरपुरम ही गाडी सोडण्यात आली होती .बुधवारी दुपारी ११.३० च्या दरम्यान ही गाडी रत्नागिरी स्थानकातून केरळच्या दिशेने निघाली . दुपारी दोन वाजण्याच्या दरम्यान राजापूर ते वैभववाडी या स्थानका दरम्यान शेर्पे परिसरात ( २८२/ २३ किलोमीटरवर) या गाडीला रेल्वे रूळावर असलेल्या ट्रॉलीची धडक बसली .कोकण रेल्वे मार्गावर सध्या विद्युतीकरणाचे काम वेगाने सुरू आहे . लार्सन अॅण्ड टुब्रो कंपनीने या कामाचा ठेका घेतला आहे . विद्युतीकरणासाठी वापरले जाणारे साहित्य ट्रॉलीच्या माध्यमातून ने - आण केले जात असते .
बुधवारी दुपारी कोकण रेल्वे मार्गावर पार्सल ट्रेन येत असल्याचे लक्षात येताच विद्युतीकरण करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी ट्रॉली रूळावरच सोडून बाजूला उडया मारल्या. सुदैवाने मोठी दुर्घटना टळून जीवितहानी झाली नसली तरी रेल्वे इंजिनला ट्रॉलीची धडक बसल्याने इंजिनचे मोठे नुकसान झाले आहे. .दरम्यान, या अपघातात विद्युतीकरण करणाऱ्या कंपनीने दाखवलेला बेजबाबदारपणा कोकण रेल्वे कशा पद्धतीने घेते हे महत्वाचे आहे.