मालवण : कोकण हा श्रीमंत प्रदेश आहे. मात्र, येथील माणसे गरीबच राहिली आहेत. कोकणच्या समृद्ध भूमीत विकासाची जागृती होणे आवश्यक आहे. पर्यटनाच्या माध्यमातून व्यापार वृद्धिंगत होण्यासाठी व्यापाऱ्यांनी विकासाच्या दृष्टीने चळवळ उभी केली पाहिजे. आम्ही सत्तेच्या माध्यमातून व्यापार क्षेत्र समृद्ध बनवू, अशी ग्वाही ग्रामविकास आणि वित्तमंत्री तथा पालकमंत्री दीपक केसरकर यांनी दिली. मालवण व्यापारी संघाच्यावतीने आयोजित सिंधुदुर्ग जिल्हा व्यापारी महासंघाचा २८वा एकता व्यापारी मेळावा येथील टोपीवाला हायस्कूलच्या पटांगणावर झाला. यावेळी पालकमंत्री केसरकर यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून मेळाव्याचा प्रारंभ करण्यात आला. यावेळी व्यासपीठावर व्यापारी महासंघाचे जिल्हाध्यक्ष विजयकुमार वळंजू, तालुकाध्यक्ष प्रमोद ओरोसकर, शहर अध्यक्ष उमेश नेरुरकर, चेंबर आॅफ कॉमर्सचे अध्यक्ष शंतनू भडकमकर, माजी अध्यक्ष आशिष पेडणेकर, सारस्वत बँक उपाध्यक्ष गौतम ठाकूर, आमदार वैभव नाईक, अलीग्रो टेक्नोलॉजीचे व्यवस्थापक प्रशांत कामत, रवी तळाशीलकर, महेश नार्वेकर, नितीन तायशेटे, नितीन वाळके यांच्यासह सर्व तालुका व्यापारी संघाचे अध्यक्ष उपस्थित होते. (प्रतिनिधी) व्यापाराची व्याप्ती वाढली पाहिजे व्यापार क्षेत्रात प्रचंड स्पर्धा निर्माण झाली आहे. जिल्ह्यात व्यापाराला पोषक वातावरण असून, येथील युवा व्यापारी वर्ग सकारात्मक दिशेने वाटचाल करत आहे. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत सामना करण्यासाठी सर्व व्यापाऱ्यांनी एकत्र येऊन जिल्ह्याला आंतरराष्ट्रीय पातळीवर नेण्यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन चेंबर आॅफ कॉमर्सचे माजी अध्यक्ष आशिष पेडणेकर यांनी केले.
व्यापार क्षेत्र समृद्ध बनवू !
By admin | Published: February 01, 2016 12:54 AM