सिंधुदुर्गनगरी : वैभववाडी तालुक्यातील लोरे नं. २ येथे भारत निर्माण मधून नळपाणी पुरवठा योजनेच्या कामात अपहार झाल्याचे चौकशीअंती स्पष्ट होत आहे. त्यामुळे या प्रकरणात दोषी असणारे सेवा पुरवठादार व पाणी पुरवठा अध्यक्षावर फौजदारी गुन्हा दाखल करा, असे आदेश जिल्हा परिषद अध्यक्ष संग्राम प्रभूगावकर यांनी शुक्रवारी जलव्यवस्थापन व स्वच्छता समितीमध्ये दिले. जिल्हा परिषद जलव्यवस्थापन व स्वच्छता समितीची सभा येथील छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात अध्यक्ष संग्राम प्रभूगावकर यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी उपाध्यक्ष एकनाथ नाडकर्णी, विषय समिती सभापती दिलीप रावराणे, आकाराम पालेकर, अंकुश जाधव, रत्नप्रभा वळंजू, समिती सचिव तथा अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी आर. के. जोशी, सचिव सदस्य जनार्दन तेली, दीपलक्ष्मी पडते, भारती चव्हाण, सुगंधा दळवी, वासुदेव परब, पंढरीनाथ राऊळ, अधिकारी खाते प्रमुख उपस्थित होते. लोरे नं. २ येथे भारत निर्माणमधून नळपाणी पुरवठा योजना मंजूर करण्यात आली होती. याला ९० लाखांचा निधीही मंजूर करण्यात आला. त्यापैकी ७० लाख रूपये पुरवठादार व पाणीपुरवठा अध्यक्षांनी या खात्यातून वर्ग करून घेतले. मात्र त्या तुलनेत नळपाणी योजनेचे काम झाले नसल्याचा आरोप मागील जलव्यवस्थापन समिती सभेत करण्यात आला होता. जिल्हा परिषद अध्यक्षानी याप्रकरणी सखोल चौकशीचे आदेश दिले होते. त्यानुसार या प्रकरणाचा अहवाल ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता सचिन देशमुख यांनी सभागृहात सादर केला. या अनुषंगाने चौकशी अहवालात अनियमितता असल्याचे सांगत जनतेच्या पैशाचा अपव्यय होत असेल तर संबंधित यंत्रणाच दोषी असल्याचे मत जिल्हा परिषद अध्यक्ष व सभापती दिलीप रावराणे यांनी मांडत सभागृहात तीव्र नाराजी व्यक्त केली. या अहवालावरून नळयोजनेचे काम रखडले असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे याला कारणीभूत असणाऱ्या स्थानिक पाणीपुरवठा समिती अध्यक्ष व ठेकेदार यांच्यावर फौजदारी कारवाई करावी असे आदेश ग्रामीण पाणीपुरवठा विभागाला दिले. जिल्ह्यात पाणी टंचाईच्या झळा मार्च महिन्यापासूनच जाणवू लागल्या आहेत. देवगड तालुक्यातील हनुमानवाडीतील ग्रामस्थांना पाण्याची सुविधा नसल्याने त्यांना एक किलोमीटर अंतरावरून पाणी आणावे लागत आहे. तर दोडामार्ग तालुक्यातील केसरीमधील दोन धनगरवाड्यामध्येही तिच स्थिती असून या ठिकाणी पाण्यासाठी वणवण करावी लागते आहे. या ठिकाणी पाण्याची सुविधा उपलब्ध करून द्या. अशी सूचना सदस्य जनार्दन तेली व पंढरीनाथ राऊळ यांनी केली. (प्रतिनिधी)सोलरपंप बंद : कंपनीवर गुन्हा दाखल करा मसुरे ग्रामपंचायत क्षेत्रात बसवलेले सोलर पंप बंद पडले आहेत. संबंधित कंपनी याची दखल घेत नाही. त्यामुळे या कंपन्यांविरोधात फौजदारी दाखल करा, असे आदेश जिल्हा परिषद अध्यक्ष संग्राम प्रभूगावकर यांनी दिले. लघु पाटबंधारे विभागातील कार्यकारी अभियंत्यांना २५ लाखापर्यंतच्या कामांना तांत्रिक मंजुरी देण्याचे अधिकार होते. मात्र आता नव्या शासन निर्णयानुसार त्यात वाढ करण्यात आली असून १ कोटीपर्यंतच्या कामांना तांत्रिक मंजुरी देता येणार आहे.
अध्यक्ष, ठेकेदारावर गुन्हे दाखल करा
By admin | Published: March 18, 2016 10:49 PM