सावंतवाडी : दुनियादारीतील ‘टिक टिक’च्या तालावर रसिकांच्या हृदयाचा ठोका चुकवणारी एन्ट्री करीत सिनेअभिनेत्री सई ताम्हणकरने सुंदरवाडी महोत्सवात शान आणली. सर्वांनी तिला टाळ्या आणि शिट्यांच्या कडकडाटात डोक्यावर घेतले. सईनेही रसिकांना तेवढीच दाद देत अभिनंदन स्वीकारत भाषणाची सुरुवात मालवणीत केली.मराठी चित्रपटातून प्रसिध्दीच्या झोतात आलेली सई ताम्हणकर येणार म्हणून रसिकांनी सुंदरवाडी महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी (रविवारी रात्री) मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. यावेळी सई ताम्हणकरचे महोत्सवाचे आयोजक तालुकाध्यक्ष संजू परब यांनी स्वागत केले. यावेळी काँग्रेस तालुकाध्यक्ष संजू परब, महिला तालुकाध्यक्ष गीता परब, मंदार नार्वेकर, स्रेहा सावंत, सुधीर आडिवरेकर, विकास कुडाळकर, डॉ. जयेंद्र परूळेकर, विकास सावंत, गुरुनाथ पेडणेकर, अंकुश जाधव, सनी कुडाळकर, प्रमोद सावंत, बाळा गावडे, अॅड. दिलीप नार्वेकर, वसंत जाधव, अन्वर खान आदी उपस्थित होते. मला ज्यांनी बोलावले, त्या माजी मुख्यमंत्री नारायण राणे, माजी खासदार नीलेश राणे, आमदार नीतेश राणे यांचे मी आभार मानते. पंधरा मिनिटांच्या स्वगतात तिने तालुकाध्यक्ष संजू परब यांचेही कौतुक केले. जाताना तिने रसिकांना अभिवादन केले आणि रसिकांनीही तिला तेवढ्याच जोशात प्रतिसाद दिला. दुसऱ्या दिवशीच्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ऋषी देसाई यांनी केले. (प्रतिनिधी)टाळ्या-शिट्यांनी दादत्यानंतर अभिनेत्री सई ताम्हणकर हिने आपले मनोगत मालवणीतच केले. ‘मी कोकणासाठी वेडीपिशी झालंय. काय म्हणता सावंतवाडीवासीयांनो’ असे म्हणताच रसिकांनी टाळ्या-शिट्यांनी दाद दिली. यावेळी तिने सौंदर्यवती स्पर्धा तसेच नंतर झालेल्या ‘सौ’ स्पर्धेसाठी उतरलेल्या सौभाग्यवतींचे तोंडभरून कौतुक केले. यावेळी तिने पुरुषांनाही धन्यवाद दिले. तुम्ही संधी दिल्यानेच तुमच्या सौभाग्यवती कार्यक्रमात भाग घेऊ शकल्या. आता तुम्ही तुमच्या पत्नीचे शिट्यांनी कौतुक करा, असे सांगितले. मी अनेकवेळा सिंधुदुर्गमध्ये आले. पण हा रसिक वेगळाच आहे. पर्यटनाचाही आनंद लुटता आला, ही भाग्याची गोष्ट आहे, असे सांगत तिने महोत्सवाच्या आयोजनाला दाद दिली.
‘टिक टिक’च्या एंट्रीने ठोका चुकला
By admin | Published: February 09, 2015 9:25 PM