सिंधुदुर्ग - युवासेनाप्रमुख आणि राज्य सरकारमधील पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे सध्या कोकणच्या दौऱ्यावर आहेत. दरम्यान, सिंधुदुर्गामध्ये दाखल झालेल्या आदित्य ठाकरे यांना नाणार रिफायनरी प्रकल्पाबाबत विचारणा केली असता त्यांनी सूचक आणि थेट विधान केलं आहे. नाणार प्रकल्प स्थलांतरित करायचा असेल, तर तो जिथे लोकांना विचारात घेऊन जिथे विरोध नसेल अशा ठिकाणी भूमिपुत्रांना न्याय कसा मिळेल, याचा विचार करून पुढची पावलं उचलली जातील, असं आदित्य ठाकरे यांनी सांगितलं.
आज कोकण दौऱ्यावर आलेल्या आदित्य ठाकरे यांना नाणार प्रकल्पाबाबत विचारलं असता ते म्हणाले की, मी आधीपण सांगितलं आहे की, नाणार प्रकल्प दुसरीकडे स्थलांतरीत करायचा हा विषय आहे. नाणार जाणार असं आपण त्यावेळीच बोललो होतो. पण तो दुसरीकडे कुठे न्यायचा तर तो लोकांचा विरोध नसेल अशा ठिकाणी लोकांना सोबत घेऊन, लोकांशी चर्चा करून स्थानिक भूमिपुत्रांना न्याय मिळेल ह्यावर विचार करूनच पुढची पावलं उचलली जातील, असे आदित्य ठाकरेंनी सांगितले.
त्याबरोबरच नवीन प्रकल्पांची उभारणी करतानाही स्थानिकांना विचारात घेतलं जाईल, असे संकेत आदित्य ठाकरे यांनी दिले. जिथे जिथे कुठेही काही नवीन करायचं असेल मग तो हायवे असेल वा रस्ते असतील किंवा कुठला मोठा प्रकल्प असेल तर स्थानिक भूमिपुत्रांना विश्वासात घेऊनच पुढे जाणार, असे त्यांनी सांगितले.