संदीप बोडवेमालवण: वनशक्ती या संस्थेच्या माध्यमातून पर्यावरण संरक्षणात कार्यरत असलेले प्रसिद्ध पर्यावरणवादी स्टालिन दयानंद यांनी आता सागर शक्ती या उपक्रमा अंतगत सागर तळाची स्वच्छता करण्याचे आव्हान स्वीकारले आहे. यासाठीच्या पायलट प्रयोगाची सुरुवात बुधवारी मालवण येथील सिंधुदुर्ग किल्ला परिसरातील समुद्रातून करण्यात आली असून भारतातील हा पहिलाच प्रयोग असल्याचा दावा त्यांनी केला आहे. सिंधुदुर्ग किल्ला परिसरातील समुद्रातील धरण या पारंपारिक नावाने ओळखल्या जाणाऱ्या समुद्री भागात सागरी तळाच्या स्वच्छतेच्या पायलट प्रकल्पाला बुधवारी सकाळी सुरुवात करण्यात आली. समुद्र तळाच्या एक हेक्टर परिसरात सहा स्कुबा डायव्हर्सनी स्वच्छ्ता करण्यास सुरुवात केली. या स्वच्छेते दरम्यान ३ तासात तब्बल ३०० कीलो प्लास्टिक कचरा बाहेर काढण्यात स्कुबा डायव्हर्सना यश आले. समुद्रातून मिळालेल्या कचऱ्यात मोठ्या प्रमाणावर प्लास्टिक बॉटल्स, प्लास्टिक पिशव्या, खाद्य पदार्थांची वेस्टणे, काचेच्या बॉटल्स, तुटलेली जाळी, अडकलेले सागरी जीव सापडून आले.
सिंधुदुर्ग किल्ल्या जवळील समुद्रातील परिसर हा सागरी जीव सृष्टीने संपन्न आहे. याठिकाणी दुर्मिळ असे प्रवाळ क्षेत्र आहे. हे प्रवाळ आणि सागरी सुंदरता पाहण्यासाठी या भागात हजारो पर्यटक स्कुबा डायव्हिंग च्या माध्यमातून समुद्रात उतरतात. वाढत्या पर्यटकांमुळे या भागातील सागरी सुंदरता धोक्यात आली आहे. हा भाग मानवी कचऱ्याचे डम्पिंग ग्राउंड होण्याची भीती निर्माण झाली आहे. जैवविविधतेने संपन्न असलेल्या मालवण जवळील समुद्रातील या भागात कचऱ्याचे प्रमाण वाढत गेल्यास भविष्यात येथील सागरी संपत्तीस धोका निर्माण होण्याची भीती निर्माण झाली होती.
मालवण जवळील समुद्रात वन शक्ती, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि भारतीय मत्सकी सर्व्हेक्षण विभाग यांच्या माध्यमातून सागर तळाची स्वच्छता मोहीम हाती घेण्यात आली आहे. या मोहीमेसाठी सागर शक्ती, मालवण नगर परिषद, महाराष्ट्र वन विभाग, युथ बीट फॉर क्लायमेट, निलक्रांती व स्थानिक पर्यटन व्यवसायिक आणि स्कुबा ड्रायव्हर्स यांचे सहकार्य लाभले आहे.
मोहिमेबद्दल बोलताना स्टालिन दयानंद म्हणाले, समुद्रात सूक्ष्म प्लास्टिक वाढत आहे. यातून मानवाला कॅन्सर सारख्या रोगांचा धोका आहे. वाढत्या समुद्री कचऱ्याच्या समस्येवर काम करताना आम्ही मालवण येथून सुरुवात केली आहे. मालवणचा समुद्र तळ सागरी जैवविविधतेने समृद्ध आहे. याठिकाणी समुद्री कचऱ्याची ही समस्या मोठी आहे. याचा परिणाम येथील सागरी जैवविविधतेवर पर्यायाने मासेमारी आणि पर्यटन उद्योगावर होत आहे.सागरी तळाच्या स्वच्छतेच्या पायलट प्रकल्पाला आता सुरुवात झाली असली तरीही आम्ही दीर्घ काळाच्या योजनेवर काम करणार आहोत. मालवण चा समुद्र किनारा आणि समुद्राचे पाणी स्वच्छ करणे हा आमचा संकल्प आहे. भविष्यात सिंधुदुर्ग शून्य प्लास्टिक क्षेत्र होण्यासाठीही आम्ही प्रयत्न करणार.