देवगड : गेली ६५ वर्षे डॉ. आंबेडकरांच्या विचारावर आधारित देशाचा कारभार सुरू आहे. सर्व घटकांना समान हक्क व संधी आपल्याला घटनेने मिळवून देण्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा वाटा मोठा असल्याचे प्रतिपादन कणकवली विधानसभा मतदारसंघाचे आमदार नीतेश राणे यांनी केले.मिठमुंबरी येथील आनंद विकास मंडळ या मंडळाच्यावतीने येथील ३२ वर्षांपूर्वी बांधण्यात आलेल्या बुद्ध विहाराचा जीर्णोद्धार सोहळा बुधवारी पार पडला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार राणे उपस्थित होते. यावेळी देवगड तालुका बौद्धजन सेवा संघाचे मुंबई अध्यक्ष मधुकर कांबळे, देवगड सभापती डॉ. मनोज सारंग, नायब तहसीलदार अशोक शेळके, मंडळ अधिकारी सतीश जाधव, मंडळाचे अध्यक्ष भाऊ मुंबरकर, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रकाश राणे, मिठमुंबरी सरपंच बाळकृष्ण गावकर, कुणकेश्वर सरपंच नयना आचरेकर, मुंबई सेवा संघाचे सरचिटणीस अॅड. प्रकाश जाधव, लहू कांबळे, सुधीर कांबळे, विनायक मिठबांवकर, ग्रामपंचायत सदस्या दक्षता मुंबरकर, पोलीसपाटील दयानंद मुंबरकर, नरेश पाटील, मुंबई मंडळाचे सदस्य यशपाल मुंबरकर, प्रवीण मुंबरकर, आदी उपस्थित होते.यावेळी आमदार नीतेश राणे यांच्या हस्ते जीर्णोद्धार सोहळ्यानिमित्त भूमिपूजन करण्यात आले, तर देवगड तालुका बौद्धजन सेवा संघाचे मुंबई अध्यक्ष मधुकर कांबळे यांच्या हस्ते फलकाचे अनावरण करण्यात आले.यावेळी राणे म्हणाले की, डॉ. आंबेडकरांचे विचार साऱ्या जगाला व देशाला प्रेरणादायी आहेत. पुढील काळामध्ये या देशाला कोणत्या मार्गाने जायचे आहे याची माहिती विचारातून देणारा एकमेव महामानव म्हणजेच डॉ. आंबेडकर आहेत. लोकप्रतिनिधींनीही जनतेच्या कल्याणासाठी गौतम बुद्धांच्या शांतीच्या मार्गाने जायला हवे हा विचारही त्यांनी दिला आहे. जनतेच्या कल्याणासाठी लोकप्रतिनिधींनी काम केले पाहिजे, अशी शिकवण त्यांनी दिली आहे. समाजातील सर्व घटकांना, स्त्रियांना समान हक्क प्राप्त करून दिले. डॉ. आंबेडकरांचे उपकार सर्व समाजावर आहेत. त्यांच्याच विचाराने आज देश चालत असून, प्रगतीच्या दिशेने वाटचाल करीत आहे. मिठमुंबरी येथील बौद्ध विहारामध्ये भावी पिढीवर चांगले संस्कार घडविण्याचे काम निश्चित येथील सुज्ञ लोक करतील. या विहाराच्या कामकाजासाठी आवश्यक सर्वतोपरी सहकार्य केले जाईल, असेही त्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)मधुकर कांबळेंची पाच लाखांची देणगीयावेळी मधुकर कांबळे यांनी विहाराच्या जीर्णोद्धारासाठी पाच लाखांची देणगी दिली. त्यांचा धनादेश अध्यक्ष मुंबरकर यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला. यावेळी अॅड. जाधव यांनीही विचार मांडले. यावेळी मधुकर कांबळे यांच्या हस्ते नरेश डामरी यांचा, तर आमदार राणे यांच्या हस्ते मंडळाचे सल्लागार नारायण मुंबरकर, यशपाल मुंबरकर, प्रवीण मुंबरकर यांचा सत्कार करण्यात आला. भाऊ मुंबरकर यांनी प्रास्ताविक व स्वागत केले, तर राजेंद्र मुंबरकर यांनी सूत्रसंचालन केले. उल्हास मुंबरकर यांनी आभार मानले.
समतेचे हक्क आंबेडकरांमुळे मिळाले
By admin | Published: October 16, 2015 9:16 PM