कणकवली : भारतात लोकशाहीचा विदारक सांगाडा शिल्लक आहे. कारण येथे निवडून येण्यासाठी नाती- गोती, जात-पात, धर्म ,दहशत अशा मार्गांचा अवलंब केला जातो. लोकशाही म्हणजे लोकांचे, लोकांनी, लोकांसाठी चालविलेले राज्य होय. मात्र, भारतात तसे दिसत नाही. त्यामुळे भारतात लोकशाही प्रस्थापित करायची असेल तर भ्रष्टाचारशाही उखडून फेकून दिली पाहिजे.असे मत स्वतंत्र कोकण राज्य संघर्ष समितीचे नेते प्रा. महेंद्र नाटेकर यांनी येथे व्यक्त केले.
स्वतंत्र कोकण राज्य संघर्ष समितीची सभा कणकवली येथे संघटनेच्या कार्यालयात रविवारी झाली. यावेळी ते बोलत होते. यावेळी वाय. जी .राणे, जे.जे.दळवी, दिलीप लाड , ए. वाय. चिलवान, प्रा.सुभाष गोवेकर, गोपाळ गोठीवरेकर, संतोष बेलोसे, गोपाळ सावंत आदी उपस्थित होते.
प्रा. महेंद्र नाटेकर म्हणाले, सर्व लोकाना अन्न, वस्त्र, निवारा, आरोग्य सुविधा, शिक्षण, न्याय मिळावा , समता, स्वतंत्रता , बंधुभाव यांचा अनुभव घेता यावा म्हणून ग्रामपंचायतींपासून संसदेपर्यंत कर्तव्यतत्पर व भ्रष्टाचार मुक्त लोकप्रतिनिधी हवेत.
घरदारांवर तुळशीपत्र ठेवून व प्रसंगी प्राणांची आहुती देऊन देशभक्तांनी भारताला स्वातंत्र्य मिळवून दिले. त्यांच्या पावलांवर पावले टाकून स्वराज्याचे सुराज्य करणारे खरेखुरे देशभक्त लोकप्रतिनिधी हवेत. मात्र , तसे दिसत नाहीत.
कररूपाने गोळा करण्यात आलेल्या पैशातून विविध योजना राबविल्या जात आहेत. परंतु त्या सामान्य जनतेपर्यंत पोहचतात का? याचा विचार कोणीच करताना दिसत नाही. अठरा पगड जाती आणि धर्म भारतात असले तरी एकात्म राष्ट्र निर्माण करणे हे आपले ध्येय आहे. पण प्रत्यक्षात जातीनिहाय आर्थिक व इतर लाभ देत असल्याने जेवढ्या जाती -धर्म आहेत.तेवढे पक्ष निघत आहेत. त्यामुळे राष्ट्रीय एकात्मतेला तडे जाऊन लोकशाहीचा बोजवारा उडाला आहे. पन्नास , साठ पक्षातून सर्वाधिक पंचवीस- तीस टक्के मते मिळविणारा पक्ष बहुसंख्येवर मात करून देशाचा कारभार करतो. याला लोकशाही म्हणता येईल का? बहुसंख्य लोकप्रतिनिधी ऐवजी बहुसंख्य लोक हाच लोकशाहीमध्ये निकष असला पाहिजे. यासाठी इंग्लड, अमेरिका या लोकशाही देशांप्रमाणे दोनच पक्ष असले पाहिजेत.
हिंदू- हिंदुत्व, राममंदिर , मराठी, बंगाली, पंजाबी आदी भाषिक अस्मिता , जाती-धर्म-पंथ ,मतांची खरेदी -विक्री , बहुमतासाठी निवडून आलेल्या आमदार व खासदार यांची खरेदी , प्रचारसभांसाठी मजुरीवर लोकांना आणणे अशा लोकशाहीला मारक गोष्टी टाळणे आवश्यक आहे. द्विपक्षीय लोकशाही कमीत कमी खर्चात राबविल्यास भारतात खऱ्या अर्थाने लोकशाहीची प्रस्थापना होईल. असा दृढ विश्वास नाटेकर यांनी व्यक्त केला. यावेळी उपस्थित अन्य मान्यवरांनीही आपली मते मांडली .