दोडामार्ग : संपूर्ण जगभरात कोरोना व्हायरसने थैमान घातले आहे. कोरोनाचे भारतातही आगमन झाले असून, गोवा राज्यात रुग्ण आढळल्याचे निदर्शनास आले. गोव्याला लागूनच दोडामार्ग तालुका असल्याने येथेही कोरोना संसर्ग होऊ शकतो. त्यामुळे या रुग्णालयात स्वतंत्र कक्षाची तजवीज करा, अशा सूचना आमदार नीतेश राणे यांनी रविवारी पाहणीदरम्यान दिल्या.गोवा राज्यात कोरोनाचे संशयित तीन रुग्ण सापडल्याच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या. त्यात दोन रुग्ण विदेशी पर्यटक असल्याचे स्पष्ट झाले. गोव्यात समुद्रकिनारा मोठा असल्याने विदेशी पर्यटक मोठ्या प्रमाणात येतात. सध्या विदेशात कोरोना व्हायरसने थैमान घातले आहे. हजारो लोकांना या आजारामुळे आपले प्राण गमवावे लागले.कोरोनाचे आगमन भारतातही झाले आहे.
दोन दिवसांपूर्वी गोवा राज्यात कोरोनाचे संशयित रुग्ण आढळल्याने खळबळ उडाली. गोवा राज्याला लागूनच दोडामार्ग तालुका असल्याने तालुक्यातील हजारो युवक-युवती नोकरी-धंद्यासाठी गोव्यात जातात. गोव्या राज्यात बाहेरून येणाऱ्या पर्यटकांंना कोरोनाची लागण असेल तर हा व्हायरस वाऱ्यासारखा पसरून अनेक रुग्ण याला बळी पडतील. जर गोव्यात या व्हायरसचा फैलाव झाला तर दोडामार्ग तालुक्यातही होऊ शकतो. त्यामुळे आमदार नीतेश राणे यांनी रविवारी दोडामार्ग रुग्णालयाची पाहणी केली.
पाहणी दरम्यान कोरोना रुग्णांसाठी स्वतंत्र कक्षाची तजवीज केली नसल्याचे निदर्शनास आले. यावेळी कोरोनाग्रस्तांसाठी स्वतंत्र कक्षाची त्वरित तजवीज करण्याच्या सूचना डॉ. रेडकर यांना त्यांनी दिल्या. यावेळी उपनगराध्यक्ष चेतन चव्हाण, माजी जिल्हा परिषद आरोग्य सभापती अनिशा दळवी, राजेंद्र निंबाळकर, विठोबा पालयेकर, सरपंच देवा शेटकर, पराशर सावंत तसेच अन्य कार्यकर्ते उपस्थित होते.दुर्लक्ष नको, गांभीर्याने घ्याकोरोना व्हायरसची लागण झपाट्याने होत असून गोवा राज्याच्या हद्दीवर असलेल्या तालुक्यांना आमदार नीतेश राणे भेट देत आहेत. रविवारी दोडामार्ग ग्रामीण रुग्णालयाला दिलेल्या भेटीदरम्यान वैद्यकीय कर्मचाऱ्यांना कोरोना व्हायरसबाबत दुर्लक्ष करू नका, गांभीर्याने घ्या, असा इशारा त्यांनी दिला.