सावंतवाडी : मित्रपक्षात असलेल्या राजन तेलींनी शिक्षण मंत्री दीपक केसरकरांना शिक्षण खात्यातले काही कळत नाही, त्यामुळे त्यांना मंत्रीपदावरुन काढून टाकावे, अशी मागणी करुन त्यांना जोरदार चपराक दिली आहे. त्यामुळे केवळ नैतिकता म्हणून तरी केसरकरांनी आता तरी आपल्या शिक्षण मंत्री पदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी ठाकरे शिवसेनेचे तालुकाप्रमुख रुपेश राऊळ यांनी प्रसिद्धीस देण्यात आलेल्या पत्रकातून केली आहे. दरम्यान, काल झालेल्या मुसळधार पावसात अनेकांचे नुकसान झाले. मात्र केसरकर मतदार संघात असताना सुध्दा त्यांनी नुकसान झालेल्यांची साधी विचारपुस सुध्दा केली नाही. तर दुसरीकडे त्यांचा वचक नसल्यामुळे आपती व्यवस्थापन यंत्रणा कुचकामी ठरली आहे, अशी टीका राऊळ यांनी केली.राजन तेली यांनी मंत्री केसरकरांची हकालपट्टी करा अशी मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे करणार असे म्हटले होते. याच पार्श्वभूमीवर राऊळ यांनी टिका करतना केसरकर यांच्या राजीनाम्याची मागणी विरोधकांनी न करता महायुतीतील नेते करत आहेत यावरून केसरकर यांची नैतिकता कळली आहे असेही राऊळ म्हणाले.दरवर्षी पावसाळ्यामध्ये पुराचा फटका सावंतवाडी तालुक्याला बसतो यामध्ये बांदा परिसर व बाजारपेठ व्यापारी वर्गाला मोठ्या प्रमाणात बसतो. मात्र प्रशासन, शासन यंत्रणा याबाबत कायमस्वरूपी मार्ग काढण्यास कुचकामी ठरली आहे. दुकानदारांचे मोठे नुकसान होते. तसेच सावंतवाडी, दोडामार्ग व वेंगुर्ला तालुक्यात नुकसान होते. तेव्हा केसरकर यांनी हे करू, ते करू असे म्हटले. मात्र काहीच केले नाही.
ते मुंबईचे निवासी झाले आहेत. आतापर्यंत अनेक आश्वासने, घोषणा केसरकर यांनी केल्या. शिक्षणमंत्री असतानाही डीएड बीएड तरुणांना वाऱ्यावर सोडून दिले. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दीडशेहून शाळा नादुरुस्त आहेत. विद्यार्थी पाणी गळत असलेल्या वर्गामध्ये बसत आहेत. फक्त घोषणा, खोट्या आशेवर लोकांना भूलभुलैया करत आहेत अशी टीका ही राऊळ यांनी केली.