सिंधुदुर्गनगरी : देशाच्या व नागरिकांच्या संरक्षणासाठी बलिदान देणाऱ्या आपल्या सैनिकांप्रती, तसेच त्यांच्या कुटुंबीयांप्रती ऋण व्यक्त करण्याकरिता ध्वजदिन निधी संकलन हे या देशाचे नागरिक म्हणून आपले परमकर्तव्य आहे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी अनिल भंडारी यांनी केले. जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियोजन सभागृहात आयोजित सशस्त्र सेना ध्वजदिन निधी संकलन प्रारंभ २0१५ व विजय दिवस यानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. याप्रसंगी जिल्हा पोलीस अधीक्षक दत्तात्रय शिंदे, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी मेजर सुभाष सासणे, निवृत्त कर्नल रविकिरण कदम, आदी मान्यवर उपस्थित होते. प्रथम शहीद जवानांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली आणि न्यू इंग्लिश स्कूल ओरोसच्या विद्यार्थिनींच्या ईशस्तवनाने कार्यक्रमास सुरुवात झाली. यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले आणि मान्यवरांच्या हस्ते ध्वजदिन निधी संकलन पेटीत निधी टाकून सशस्त्र सेना ध्वजदिन निधी संकलन २0१५ चा प्रारंभ करण्यात आला. जिल्हाधिकारी अनिल भंडारी म्हणाले, देशाच्या सीमेवर आपले सैनिक अत्यंत प्रतिकूल वातावरणात देशाचे संरक्षण करीत आहेत. त्यामुळेच आपण आपले दैनंदिन जीवन निवांत आणि सुरक्षितपणे जगत आहोत. त्यांच्यामुळेच आपण आपले स्वातंत्र्य उपभोगत आहोत. त्यासाठीच आपण सदैव त्यांचे ऋणी असू. २0१४ सालाचे सिंधुदुर्ग जिल्ह्याचे ध्वजदिन निधीसंकलनाचे उद्दिष्ट पूर्ण करून १३५ टक्के उद्दिष्ट साध्य केले आहे. सैनिकांना सुट्या कमी असतात. त्यामुळे जेव्हा शासकीय अधिकारी आणि कर्मचारी यांचा सरकारी कामासाठी संबंध येतो, तेव्हा त्यांना संवेदनशीलपणे प्राधान्य द्यावे, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.यावेळी सिंधुदुर्ग जिल्ह्याने २0१४ करिता ३८ लाख ६१ हजार रुपये ध्वजदिन निधी संकलन करून १३५ टक्के उद्दिष्टपूर्ती केल्याबद्दल महाराष्ट्र शासनाचे स्मृतिचिन्ह जिल्हाधिकारी अनिल भंडारी व जिल्हा सैनिक अधिकारी मेजर सुभाष सासने यांना प्रदान करण्यात आले, तसेच शहीद जवानांच्या पालकांचा आणि पत्नींचा शाल आणि श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला. त्याचबरोबर दहावी, बारावीत विशेष गुण संपादित केलेल्या सैनिकांच्या पाल्यांचा उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. स्मिता नलवडे यांनी सूत्रसंचालन केले, तर सुभाष शिर्के यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)देशभक्तीचा सन्मान राखाजिल्हा पोलीस अधीक्षक दत्तात्रय शिंदे म्हणाले, देशासाठी हुतात्मा झालेल्या शूर जवानांना अभिवादन करण्यासाठी विजय दिवस साजरा केला जातो. देशाच्या संरक्षणासाठी आपल्या प्राणांची आहुती देणाऱ्या सैनिकांचा हा सन्मान आहे. लढत असताना सैनिकांपुढे जेव्हा कुटुंब किंवा देश असा पर्याय उभा राहतो, तेव्हा तो देशाची निवड करतो. इतकेच नव्हे तर स्वत: किंवा देश अशी जेव्हा परिस्थिती निर्माण होते, तेव्हा देखील आपले शूर सैनिक देशाची निवड करतात. त्यांच्या या देशभक्तीचा सन्मान म्हणून आपण सर्वांनी ध्वजदिन निधीसाठी कर्तव्य भावनेने व सढळ हस्ते निधी देऊन सहभाग दिला पाहिजे.
ध्वजदिन निधी संकलन हे प्रत्येकाचे कर्तव्य
By admin | Published: December 11, 2015 11:39 PM