रत्नागिरी : रत्नागिरी तालुक्यासाठी रविवार हा घातवार ठरला. काही तासांच्या फरकाने तीन विविध ठिकाणी समुद्रामध्ये सहाजण बुडाले. त्यातील चौघांचा मृत्यू झाल्याची घटना रविवारी घडली. विलास गोपाळ भाटकर, ब्रीजकिशोर सोनी, नरसिंग शेडशाळे व नंदकुमार महादेव आंबेकर अशी मृतांची नावे आहेत. सोनी व शेरसादे हे इचलकरंजीमधील आहेत.रविवारी सकाळी १० ते १२च्या सुमारास विलास गोपाळ भाटकर (वय ४५, भाट्ये) हे आपल्या दोन मित्रांसह भाट्ये समुद्रकिनारी झरीविनायक मंदिरासमोरच्या सागरी परिसरामध्ये पोहण्यासाठी गेले. पोहता येत नसल्याने भाटकरांचा पाण्यामध्ये बुडून मृत्यू झाला.दुसऱ्या एका घटनेमध्ये इचलकरंजी येथील चार पर्यटक गणेशगुळे समुद्रकिनारी आले होते. त्यांना समुद्राच्या पाण्यामध्ये पोहण्याचा मोह आवरला नाही. चौघेही सकाळी ११.४५च्या सुमारास गणेशगुळे समुद्रकिनारी पोहत असता ब्रीजकिशोर सोनी (३०) व नरसिंग शेडशाळे (४५, दोन्ही राहणार इचलकरंजी) यांना पाण्याचा अंदाज न आल्याने त्यांचा समुद्रामध्ये बुडून मृत्यू झाला. त्यांचे अन्य दोन मित्रही त्यांच्याबरोबर पाण्यामध्ये गेले होते. मात्र त्यांना वाचविण्यात ग्रामस्थांना यश आले. त्यांची नावे उशिरापर्यंत पोलिसांकडेही उपलब्ध नव्हती.तालुक्यातील मुख्य मासेमारी बंदर समजल्या जाणाऱ्या मिरकरवाडा समुद्रामध्ये मासेमारी करणाऱ्या नौकेवरील खलाशी नंदकुमार महादेव आंबेकर (३५, पूर्णगड) हे पाण्यात पडून मृत झाले. इम्तिहाज सारंग यांच्या मासेमारी नौकेवर काम करीत असताना रविवारी दुपारी दोनच्या सुमारास नंदकुमार यांचा पाण्यात पडून मृत्यू झाला. (वार्ताहर)इचलकरंजीत शोककळा--नरसिंग शेडशाळे यांचे इचलकरंजी येथे बंगला रोडवर परफेक्ट एजन्सीज नावाचे दुकान असून, ते दुकानाच्या मागील बाजूस कुटुंबीयांसह राहत होते. तसेच ब्रीजकुमार सोनी हे ‘आयडिया’ या मोबाईल कंपनीमध्ये क्षेत्रीय विक्री व्यवस्थापक होते. ते सांगली रोडवर एका सदनिकेत राहत होते. या दोघांचेही समुद्रामध्ये बुडून निधन झाल्याचे वृत्त समजताच त्या परिसरामध्ये शोककळा पसरली होती. रात्री उशिरापर्यंत दोघांचेही मृतदेह इचलकरंजीत आणण्याचे प्रयत्न सुरू होते.पर्यटकांच्या सुरक्षेचे काय?--जिल्हाभरात काही दिवसातच अनेक पर्यटकांचा बुडून मृत्यू झाला आहे. मात्र, अद्यापही प्रशासनाकडून पर्यटकांच्या सुरक्षिततेसाठी ठोस उपाययोजना करण्यात आलेल्या नाहीत. अपघातानंतर ही सुरक्षा यंत्रणा जैसे थे असल्याचे चित्र आहे. प्रशासनाने पर्यटकांच्या माहितीसाठी किमान या ठिकाणी आवश्यक फलक लावणे गरजेचे बनले आहे.
समुद्रात बुडून चौघांचा मृत्यू
By admin | Published: September 13, 2015 10:06 PM