वैभववाडी : समाज जागृत असतो तिथे गुन्ह्याचे प्रमाण कमी असते. त्यामुळे समाजाने पोलिसांना आपले मित्र मानून सहकार्याची भूमिका ठेवणे आवश्यक आहे. वर्दीवरील पोलिसातील माणूस आतून फारच वेगळा असतो. त्यांच्या या दुहेरी भुमिकेमुळेच समाजव्यवस्था सुदृढ आहे, असे प्रतिपादन महिला बालकल्याण सभापती स्नेहलता चोरगे यांनी येथे केले.वैभववाडी पोलीस ठाण्याच्यावतीने शहरातून रविवारी ‘पोलीस मित्र’ प्रभात फेरीचे आयोजन करण्यात आले होते. पोलीस ठाण्यापासून अ. रा. विद्यालय, दत्तमंदिर ते संभाजी चौक अशी प्रभात फेरी काढल्यानंतर चौकात विविध मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी पोलीस उपनिरीक्षक एस. के. घाडगे, आर डी गुरव, पंचायत समिती सदस्य बंड्या मांजरेकर, शुभांगी पवार, गटविकास अधिकारी सदानंद पाटील, आनंदीबाई रावराणे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सी. एस. काकडे, संदीप पाटील, नगरसेवक रवींद्र रावराणे, उद्योगपती विकास काटे, प्रा. एस. एन. पाटील, व्यापारी मंडळाचे अध्यक्ष मनोज सावंत, तालुक्यातील सरपंच, व महाविद्यालयान विद्यार्थी उपस्थित होते.चोरगे पुढे म्हणाल्या, समाजात अनेक घटना घडत असतात. त्यातील काही घटना गुन्हेगारी स्वरुपाच्या असतात. अशा घटनांबाबत नागरीकांनी तत्काळ पोलीसांना माहिती देणे आवश्यक आहे. अन्यथा दिल्लीतील ‘निर्भया’पासून कणकवलीतील सामूहिक अत्याचारासारखी प्रकरणे घडत राहतात. तरुण पिढीने आपल्याकडील साधनांचा वापर मर्यादितच करण्याची गरज आहे. कारण मोबाईलच्या गैरवापरामुळे गुन्हेगारीत वाढ होत आहे. त्यामुळे मोबाईल, इंटरनेट यांच्या अतिवापरामुळे आपण नकळत एखाद्या गुन्ह्यात अडकण्याची शक्यता अधिक आहे.उपनिरीक्षक गुरव म्हणाले, कोणत्याही व्यक्तीची अडचण असेल तर मध्यस्थ न घालता थेट पोलीसांकडे यावे, त्याची बाजू समजून घेऊन कायद्याच्या चौकटीत बसवून शक्य तेवढे सहकार्य आम्ही करीत असतो. मात्र, नियम मोडायचा आणि वर मध्यस्थांमार्फत आम्हालाही नियमबाह्य काम करायला सांगायचे ही वृत्तीच पूर्णपणे चुकीची आहे. तरुण पिढी हे देशाचे सामर्थ्य आहे. त्यामुळे तरुणाईने चुकीच्या मार्गाने जाण्याचा प्रयत्न करु नये, असे आवाहनही त्यांनी केले.यावेळी संदीप पाटील पाटील, विकास काटे, तसेच आनंदीबाई व कृषी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त केले. या फेरीमध्ये संजय खाडे, शिंगाडे, एस एस कदम आदी पोलीस कर्मचारी सहभागी होते. पोलीस नाईक हरकुळकर यांनी सूत्रसंचालन केले व आभार मानले. (प्रतिनिधी)
पोलिसांना मित्र मानून प्रत्येकाने सहकार्य करावे
By admin | Published: November 22, 2015 11:22 PM