सांगली : विधानसभा सार्वत्रिक निवडणूक - 2019 च्या अनुषंगाने ईव्हीएम/व्हीव्हीपॅट ची प्रथमस्तरीय तपासणीस आज वैरण बाजार, मिरज येथील शासकीय गोदाम येथे सुरु करण्यात आली. ही तपासणी दिनांक 31 ऑगस्ट 2019 पर्यंत पूर्ण करण्यात येईल, अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी दिली.आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी, मतदार नोंदणी अधिकारी, सहायक मतदार नोंदणी अधिकारी, निवडणूक यंत्रणेतील अन्य अधिकारी-कर्मचारी, विविध राजकीय पक्षांचे प्रतिनिधी, माध्यम प्रतिनिधी, मतदार यांच्या उपस्थितीत ईव्हीएम/व्हीव्हीपॅट मशीनची प्रथमस्तरीय तपासणी सुरू करण्यात आली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी उपजिल्हा निवडणूक अधिकारी मिनाज मुल्ला, उपजिल्हाधिकारी विवेक आगवणे, मिरज उपविभागीय अधिकारी डॉ. विकास खरात आदि उपस्थित होते.यावेळी जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी म्हणाले, आगामी विधानसभा निवडणूकीची तयारी सुरु असून त्यामध्ये कोणताही विलंब प्रशासनाकडून होणार नाही. पूरपरिस्थितीमुळे अधिकारी/कर्मचारी जरी कामात व्यस्त असले तरीही निवडणुकीचे काम वेळेत पूर्ण होईल.