रत्नागिरी : सैनिक देशासाठी लढतो, त्याला भ्रष्टाचार माहीत नाही. तो कुठलीही जात, धर्म पाहात नाही. पण राजकीयस्तरावर शासनाकडून त्याची जात आणि धर्मामध्ये विभागणी केली जातेय, आजी माजी सैनिकांना ‘व्हाईट कार्ड’ दिल्याने त्यांना रेशन दुकानावर धान्य, केरोसीन मिळत नाही. आजही शासनदरबारी आमची अपेक्षाच होते. आम्हाला वेळेवर दाखले मिळतात का, अशा अनेक व्यथा आजच्या माजी सैनिकांच्या मेळाव्यात व्यक्त झाल्या.भारत पाक युद्ध विजयाला ५० वर्षे पूर्ण होत आहेत. विजयाच्या सुवर्ण महोत्सवाच्या निमित्ताने राज्याचा सैनिक कल्याण विभाग, तसेच माजी सैनिक संघटना, रत्नागिरी व सिंंधुदुर्ग यांच्या विद्यमाने माजी सैनिकांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. यावेळी या युद्धात तसेच इतरही युद्धात शहीद झालेल्या सैनिकांच्या विधवा पत्नींचा तसेच शौर्यपदक मिळालेल्यांचा सत्कार करण्यात आला. अध्यक्षस्थानी अपर जिल्हाधिकारी गोपाळ निगुडकर होते. यावेळी व्यासपीठावर निवृत्त सुभेदार अंकुश चव्हाण, महाराष्ट्र माजी सैनिक महामंडळाचे (मेस्को) कर्नल देशपांडे, भारतीय माजी सैनिक संघटनेचे राज्याचे अध्यक्ष पीटर डॉन्टस, कर्नल शशिकांत सुर्वे, मेजर प्रकाश आंब्रे, राष्ट्रवादीचे माजी जिल्हाध्यक्ष कुमार शेट्ये, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख राजेंद्र महाडिक, फिनोलेक्सचे जनसंपर्क अधिकारी डॉ. आशुतोष मुळ्ये आदी उपस्थित होते.रत्नागिरी जिल्ह्यातील २८ आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील २३ अशा एकूण ५१ जणांचा मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला. यावेळी १९६५ च्या युद्धाच्या आठवणी काही मान्यवरांनी व्यक्त केल्या. १९७१च्या भारत - पाक युद्धात सहभागी असलेले कर्नल शशिकांत सुर्वे, १९६२, १९६५ आणि १९७१ या तीनही युद्धात कामगिरी केलेले आणि वीरचक्र मिळालेले सुभेदार अंकुश चव्हाण यांनी या युद्धांच्या काही आठवणी जागृत केल्या. भारतीय माजी सैनिक संघटनेचे राज्याचे अध्यक्ष पीटर डॉन्टस यांनी माजी सैनिकाला आज अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे, ही भावना व्यक्त करतानाच राजकारणी व्यक्ती आणि शासनावर ताशेरे ओढले. माजी सैनिकांना आज जातीपातीच्या तुकड्यात विभागले जातेय, हे थांबवायला हवे, असे ते म्हणाले. अपर जिल्हाधिकाऱ्यांनी माजी सैनिकांसाठी ४ हेक्टर शेतजमीन आणि घरासाठी भूखंड देण्याबाबतची अंमलबजावणी होण्यासाठी आजच्या बैठकीत सर्व तहसीलदारांना आदेश देण्यात येतील, असे सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अजित करंदीकर यांनी केले. (प्रतिनिधी)अमेरिकेने आपले मित्र राष्ट्र पाकिस्तानला दिलेला अभेद्य रणगाडा नष्ट करणे, भारतापुढे आव्हानच होते. तत्कालीन पंतप्रधान लालबहाद्दूर शास्त्री यांनी शास्त्रज्ञ होमी भाभा यांच्याशी सल्लामसलत केली. त्यांनी अणुऊर्जेचा वापर करण्याचा सल्ला दिला. त्यानुसार पहिल्यांदाच या युद्धात अणुऊर्जेचा वापर करून रणगाडा उद्ध्वस्त करण्यात आला.
माजी सैनिकांचीही जात, धर्मात विभागणी
By admin | Published: September 23, 2015 9:39 PM