वैभववाडी : राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या उत्कृष्ट कार्याबद्दल मुंबई विद्यापीठातर्फे दिला जाणारा जिल्हास्तरीय उत्कृष्ट महाविद्यालय युनिट पुरस्कार येथील आनंदीबाई रावराणे महाविद्यालयाने पटकावला आहे. विद्यापीठाच्या कलिना कॅम्पसमधील फिरोजशहा मेहता सभागृहात हा पुरस्कार वितरण सोहळा नुकताच पार पडला.राष्ट्रीय सेवा योजना विभागांतर्गत सामाजिक, सांस्कृतिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या महाविद्यालयास जिल्हास्तरीय उत्कृष्ट महाविद्यालय राष्ट्रीय सेवा योजना युनिट पुरस्कार देऊन दरवर्षी गौरविले जाते. सन २०१३-१४ च्या शैक्षणिक वर्षातील कार्याबद्दल या पुरस्काराने वैभववाडी विद्यालयास विद्यापीठाने गौरविले आहे.राज्याचे संपर्क अधिकारी डॉ. अतुल साळुंखे, माजी संपर्क अधिकारी डॉ. निलोफकर अहमद यांच्या हस्ते प्राचार्य डॉ. सी. एस. काकडे यांनी हा पुरस्कार स्वीकारला. यावेळी विद्यापीठाचे राष्ट्रीय सेवा योजना समन्वयक डॉ. बिडवे, महाराणा प्रतापसिंह शिक्षण संस्थेचे उपाध्यक्षविश्वनाथ रावराणे, एसआरडी कॅम्पचे प्रमुख फोंडेकर, आदी उपस्थित होते. महाविद्यालयाने हा पुरस्कार पटकावल्याबद्दल राज्याचे शिक्षणमंत्री तथा संस्थाध्यक्ष विनोद तावडे यांनी प्राध्यापकवृंद व विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. (प्रतिनिधी)
आनंदीबाई महाविद्यालयाला उत्कृष्ट महाविद्यालय युनिट पुरस्कार
By admin | Published: January 21, 2015 9:27 PM