सिंधुदुर्ग : जिल्हांतर्गत बदलीतील विस्थापित आणि रॅडम राउंड बदलीतील शिक्षकांचे चुकीच्या पद्धतीने जिल्हा परिषद प्रशासन समुपदेशन करीत असल्याचा आरोप करत या पद्धतीला शिक्षक संघटनांनी आक्षेप घेतला आहे. प्रशासनाच्या या कार्यपद्धतीविरोधात सर्व शिक्षक संघटनांनी प्राथमिक शिक्षणाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन छेडले. तसेच शिक्षकांनी समुपदेशन प्रक्रियेवर बहिष्कार टाकला.सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदली प्रक्रिया मे मध्ये राबविण्यात आली होती. मात्र, त्यावेळी समुपदेशन पद्धतीत अनेक शिक्षक विस्तापित झाले होते. विस्तापित शिक्षकांना समुपदेशन पध्दतीने पुन्हा पदस्थापना देण्यात यावी, अशी मागणी शिक्षक संघटनांनी लावून धरली होती. त्यानुसार जिल्हांतर्गत बदली प्रक्रियेतील विस्तापित आणि रँडम राउंड टप्पा क्र. ५ व ६ मधील समुपदेशन पद्धतीने पदस्थापना देण्यात यावी असा ४ सप्टेंबर २०१९ रोजी शासन निर्णय झाला.
या शासन निर्णयानुसार राज्यातील सर्व जिल्ह्यात ११ सप्टेंबर रोजी शिक्षकांना पदस्थापना देण्याची कार्यवाही सुरु करण्याय आली होती. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील सर्व प्राथमिक शिक्षक संघटनांनी आज जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी के. मंजुलक्ष्मी आणि प्राथमिक शिक्षणाधिकारी एकनाथ आंबोकर यांची भेट घेत विस्थापित व रँडम राउंड टप्पा ५ व ६ मधील समुपदेशन पद्धतीने पदस्थापना देण्याची मागणी केली. मात्र जिल्हांतर्गत बदली प्रक्रियेत विस्थापित शिक्षकांना विस्थापित व रँडम राउंड टप्पा ५ व ६ मधील समुपदेशन पद्धतीने पदस्थापना देण्याच्या शासन आदेशाला हरताळ फासत समुपदेशन करण्यास जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी आणि प्राथमिक शिक्षणाधिकारी यांनी नकार दिला होता.
त्यामुळे सर्व प्राथमिक शिक्षक संघटनांनी ११ सप्टेंबर रोजी जिल्हा परिषदेसमोर धरणे आंदोलन छेडले होते. या आंदोलनाच्या अंनुषंगाने शुक्रवारी शिक्षकांचे समुपदेशन आयोजित केले होते. मात्र ही प्रक्रियाही प्रशासन चुकीच्या पध्दतीने राबवित असल्याचा आरोप केला.दहा जणांचे समुपदेशन झाले, प्रक्रियेवर बहिष्काराचे पत्रदरम्यान, याबाबत प्राथमिक शिक्षणाधिकारी एकनाथ आंबोकर यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी मनमानीचा आरोप फेटाळून लावला. तसेच २७ फेब्रुवारी २०१९ च्या शासन निर्णयानुसार कार्यवाही करण्याचे आदेश शासनाने दिल्याने समानीकरण धोरणानुसार समुपदेशन करणे आवश्यक असून त्यानुसार हे समुपदेशन आयोजित करण्यात आले होते. दरम्यान, आजच्या समुपदेशनात ४ आंतरजिल्हा बदली आणि ६ रँडम राउंडमधील शिक्षकांनी असे १० शिक्षकांनी अर्ज केले होते. त्यांचे आज समुपदेशन करण्यात आले असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.आजची समुपदेशन प्रक्रिया चुकीच्या पद्धतीने होत असल्याने या प्रक्रियेत आपल्यावर अन्याय होणार असल्याने आपल्या समुपदेशनाचा हक्क अबाधित ठेवून या प्रक्रियेत शिक्षकांनी आक्षेप नोंदवून प्रक्रियेवर बहिष्कार टाकला तसे पत्रही शिक्षकांनी सादर केले.शिक्षकांची समुपदेशन प्रक्रिया जिल्हा प्रशासन चुकीच्या पद्धतीने राबवित असल्याने शिक्षक संघटनांनी या प्रक्रियेला आक्षेप घेत सर्व शिक्षकांनी चक्क प्राथमिक शिक्षणाधिकारी यांच्या दालनासमोर काही काळ ठिय्या आंदोलन केले.