सिंधुदुर्गनगरी : मागील चार दिवसांपासून जिल्ह्यात सुरू असलेली पावसाची संततधार शुक्रवारी कमी झाली. पावसाच्या अधूनमधून सरी कोसळत होत्या. संततधार कमी झाल्याने पूरपरिस्थिती नियंत्रणात होती. दरम्यान, जिल्ह्यात गेल्या चौवीस तासात शुक्रवार सकाळपर्यंत कुडाळ तालुक्यात सर्वाधिक २०७.४ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यात सरासरी १५०.२ मि.मी. पाऊस झाला असून, एकूण सरासरी १६४१ मि.मी. पाऊस झाला आहे.मुसळधार पावसाने बुधवार आणि गुरुवारी सिंधुदुर्गला झोडपून काढले. परिणामी अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली होती. कुडाळमध्ये भंगसाळ नदीला आलेल्या पुराचे पाणी शहरातील आंबेडकरनगरामध्ये घुसले होते, तर तेरेखोल नदीला आलेल्या पुराचे पाणी बांदा आळवाडीतील मच्छीमार्केट परिसरात घुसले होते. सतत पडणाऱ्या पावसामुळे भुईबावडा घाटातही छोट्या-मोठ्या दरडी कोसळत होत्या. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले होते. ग्रामीण भागातील छोटे-मोठे कॉजवे पाण्याखाली गेल्याने वाहतूकही ठप्प होती.धरणांच्या पाणीसाठ्यात वाढतिलारी-आंतरराज्य प्रकल्पामध्ये ३०९.७९२ द.ल.घ.मी. पाणीसाठा असून, धरण ६९.२५ टक्के भरले आहे. जिल्ह्यातील मध्यम व लघुपाटबंधारे, मृद व जलसंधारण प्रकल्पांमध्ये आता पाणीसाठा वाढला आहे, तर तिलारी नदी ३८.६००, कर्ली नदीची ९ मीटर, वाघोटन नदीची ६ मीटर, गद नदीची ३५.२०० तर तेरेखोल नदीची पातळी ६ मीटरवर आहे. नद्या इशारा पातळीपर्यंत भरल्या आहेत.
सिंधुदुर्गात पावसाची उघडीप; पूरस्थिती पूर्वपदावर, कुडाळ तालुक्यात सर्वाधिक पाऊस
By महेश विद्यानंद सरनाईक | Published: July 21, 2023 7:01 PM