कणकवली : कोकण सिंचन महामंडळाचे माजी उपाध्यक्ष संदेश पारकर यांनी काँग्रेस पक्षविरोधी कारवाई केल्याबद्दल त्यांना पक्षाच्यावतीने कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली होती. या नोटिसीचा खुलासा सात दिवसांच्या आत न दिल्याने नोटिसीतील मुद्द्यांशी ते सहमत आहेत, असेच म्हणावे लागेल. त्यामुळे जिल्हा काँग्रेसचे भविष्यातील नुकसान टाळण्यासाठी, तसेच पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी त्यांची काँग्रेसमधून सहा वर्षांसाठी हकालपट्टी करण्यात आली असल्याची माहिती राष्ट्रीय काँग्रेसचे सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष सतीश सावंत यांनी येथे दिली.येथील काँग्रेस संपर्क कार्यालयात मंगळवारी आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी माजी जिल्हा परिषद अध्यक्ष संदेश सावंत, जिल्हा परिषद सदस्य मधुसुदन बांदिवडेकर, तालुकाध्यक्ष सुरेश सावंत उपस्थित होते. यावेळी सतीश सावंत यांनी संदेश पारकर यांना हकालपट्टीबाबत दिलेले पत्र सादर केले. तसेच या पत्राची प्रत (पान १ वरून) प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, माजी मुख्यमंत्री नारायण राणे, आमदार नीतेश राणे, माजी खासदार नीलेश राणे यांनाही पाठविण्यात आली असल्याचे यावेळी सांगितले.संदेश पारकर यांना दिलेल्या पत्रात म्हटले आहे की, ३ डिसेंबर २0१५ला पक्षविरोधी कारवाई केल्याबद्दल आपल्याला कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली होती. तसेच या नोटिसीचा खुलासा सात दिवसांच्या आत करण्यास सांगितले होते; परंतु त्या नोटिसीला उत्तर अथवा खुलासा पक्षाजवळ आपण अद्याप सादर केलेला नाही. या नोटिसीमध्ये पुढील मुद्दे उपस्थित करण्यात आले आहेत.८ आॅक्टोबर २0१५ला कणकवली नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष व उपनगराध्यक्ष निवडीवेळी काँग्रेस पक्षाच्या चिन्हावर निवडून आलेल्या पाच नगरसेवकांनी बंडखोरी केली होती. त्यामुळे पक्षाने घोषित केलेल्या नगराध्यक्ष व उपनगराध्यक्ष पदाच्या उमेदवारांचा पराभव झाला. या पाच नगरसेवकांना बंडखोरी करण्यास आपण प्रवृत्त केले आहे. तसेच नगराध्यक्ष व उपनगराध्यक्ष निवडीनंतर झालेल्या आनंदोत्सवात पाच बंडखोर नगरसेवक तसेच विरोधकांसमवेत आपण सहभागी झाला होतात. आपण पक्षात आल्यापासून पक्षाने निमंत्रण देऊनही विविध कार्यक्रमांत आपण सहभागी होण्याचे टाळले आहे. (वार्ताहर)पक्षाचे नुकसान टाळण्यासाठी सहा वर्षांची कारवाईजिल्हा कार्यकारिणीच्या सभेला निमंत्रित करूनही आपण उपस्थित राहिला नाहीत. आपण काँग्रेस पक्षात प्रवेश केल्यापासून आपणाकडून पक्ष वाढीसाठी कोणतेही प्रयत्न झालेले नाहीत. तसेच आपले अपेक्षित सहकार्यही पक्षाला मिळालेले नाही. त्यामुळे पक्षविरोधी कारवाईबाबत आपल्याला नोटीस देण्यात आली होती. मात्र, आपणाला पुरेसा अवधी देऊनही नोटिसीला उत्तर न दिल्याने वरील सर्व मुद्द्यांशी आपण सहमत आहात, असे समजून सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेसचे भविष्यातील नुकसान टाळण्यासाठी व पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी या पत्राद्वारे आपली पक्षातून सहा वर्षांसाठी हकालपट्टी करण्यात येत आहे, असेही या पत्रात म्हटले आहे. दरम्यान, संदेश पारकर यांची याबाबत प्रतिक्रिया घेण्यासाठी दूरध्वनीद्वारे संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता तो होऊ शकला नाही.
पारकर यांची काँग्रेसमधून हकालपट्टी
By admin | Published: January 05, 2016 11:57 PM