कणकवली : शेतमालाची नेमकी ओळख, गुणवत्तेची खात्री व आंतरराष्ट्रीय बाजारपेठेची संधी उपलब्ध करून देणाऱ्या काजू व कोकम पिकाच्या भौगोलिक मानांकनासाठी मान्यताप्राप्तकर्ता म्हणून सिंधुदुर्ग व रत्नागिरीतील शेतकऱ्यांना नोंद करण्यासाठी असलेल्या मुदतीत मंगळवार (दि. ५) पर्यंत वाढ करण्यात आली आहे. जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या संधीचा फायदा घेण्यासाठी वागदे येथील गोपुरी आश्रम येथे नोंदणी करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.वेंगुर्ला काजू व सिंधुदुर्ग-रत्नागिरी कोकम यांना विशेष भौगोलिक म्हणजे ‘जीआय’ मानांकन मिळाले आहे. या उत्पादनांचे शास्त्रीय विश्लेषण करण्यात आले आहे. या विश्लेषणात वेंगुर्ला काजू हा इतर काजूंपेक्षा गुणात्मकदृष्ट्या कसा वरचढ आहे व त्यासाठी या भागातील भौगोलिक रचना कशी उपयुक्त आहे हे सिद्ध करण्यात आले. वेंगुर्ला काजूला जाड साल, सर्वाधिक गर आणि क जीवनसत्त्व अशी अनेक वैशिष्ट्ये लाभली आहेत. सिंधुदुर्ग-रत्नागिरी कोकमच्या बाबतीत रत्नागिरी, सिंधुदुर्गातील हवामान, पाऊस, माती या भौगोलिक वैशिष्ट्यांमुळे नैसर्गिकरीत्या कोकमला औषधी गुणधर्म प्राप्त झाले आहेत, हे सिद्ध करण्यात आले.विशिष्ट भूभागातील माती, पाणी आणि वातावरणामुळे, तसेच शेतकऱ्यांच्या व्यवस्थापन कौशल्यातून शेतीमालास रंग, वास, चव, आकार, आदी गुणवैशिष्ट्यांमध्ये वेगळेपण लाभते. अशा दर्जाची खात्री जीआय अर्थात भौगोलिक निर्देशन, मानांकनातून मिळते. भौगोलिक निर्देशन (जीआय) अधिकारांतर्गत उत्पादनांची क्षमता, दर्जा आणि इतर वैशिष्ट्यांचा समावेश होतो.कोकण काजू समूह, गोपुरी आश्रम वागदे आणि सिंधुदुर्ग-रत्नागिरी महाकोकम संस्था विरण-मालवण संस्थांना नोंदणीकृत प्राप्त कर्ता असा दर्जा मिळाला आहे. भौगोलिक मानांकनाचा फायदा जास्तीतजास्त व्हावा, यासाठी आता केंद्र्राच्या वाणिज्य मंत्रालयाकडे मान्यताप्राप्त कर्ता म्हणजेच शेतकरी, प्रक्रिया उद्योजक व व्यापाऱ्यांची नोंद जास्तीतजास्त प्रमाणात होणे आवश्यक आहे.दरम्यान, भौगोलिक (जीआय) मानांकनामुळे शेतमालाला नेमकी ओळख व प्रतिष्ठा प्राप्त होते. गुणवत्तेची खात्री मिळते. या नोंदणीद्वारे नोंदणीकृत सदस्यच आपल्या उत्पादनावर वेंगुर्ला काजू किंवा सिंधुदुर्ग रत्नागिरी कोकम असे जीआय मानांकनाचे नाव लिहू शकतो. निर्यात तसेच मोठ्या शहरांमध्ये गुणवत्ताधारक उत्पादन म्हणून सध्याच्या किमतीपेक्षा जास्त किंमत काजू व कोकमला याद्वारे मिळणार आहे. (वार्ताहर)भौगोलिक उपदर्शन नोंदणी कार्यालयात नोंद करावीवेंगुर्ला काजू आणि सिंधुदुर्ग-रत्नागिरी कोकम असे भौगोलिक मानांकन मिळाले असले तरी त्याचा फायदा घेण्यासाठी येथील शेतकरी, प्रक्रिया उद्योजक व व्यापाऱ्यांनी आपली नोंद भौगोलिक उपदर्शन नोंदणी कार्यालयात करणे अत्यावश्यक आहे. याबाबत अधिक माहितीसाठी अनंत राणे किंवा गोपुरी आश्रम कणकवली वागदे येथे संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
काजू-कोकमच्या ‘मानांकन’साठी मुदतवाढ
By admin | Published: April 01, 2016 10:24 PM