कणकवलीः मालवण तालुक्यातील आंगणेवाडी येथील श्री भराडी देवीच्या यात्रेसाठी एसटीचा सिंधुदुर्ग विभाग सज्ज झाला आहे. जिल्ह्याच्या विविध आगारातून आणि विविध भागातून एसटीच्या १४५ बस सोडण्यात येणार आहेत. भराडी देवीच्या यात्रेसाठी लाखो भाविक सिंधुदुर्गात दाखल होत असतात. २ मार्चला ही यात्रा होत असून एसटीच्यावतीने बस गाड्यांचे नियोजन करण्यात आले आहे. एसटी महामंडळाच्यावतीने यंदा १ मार्च रोजी रात्री १० वाजल्यापासून बस सेवा सुरू करण्यात आली आहे.प्रवाशांचे भारमान पाहून रेल्वे स्टेशन पासून एसटी आगारापर्यंत जादा गाड्या सोडण्यात येणार आहेत. याचबरोबर कुडाळ ते आंगणेवाडी २२ गाड्या, कसाल हिवाळेमार्गे आंगणेवाडी ४ गाड्या, कसाल, खोटले ते आंगणेवाडी ५ गाड्या, निरुखे, पांग्रड ते आंगणेवाडी ३ गाड्या, पणदूर, ओरोस ते आंगणेवाडी १ गाडी अशा कुडाळ येथून ३५ गाड्या धावतील. मालवण तालुक्यातील मालवण बस आगार ते आंगणेवाडी २० गाड्या, टोपीवाला हायस्कूल ते अंगणेवाडी ३ गाड्या, देवबाग तारकर्ली ते आंगणेवाडी ४ गाड्या, आनंदव्हाळ ते आंगणेवाडी, डांगमोडे ते आंगणेवाडी, सर्जेकोट ते आंगणेवाडी, मालोंड ते आंगणेवाडी प्रत्येकी १ गाडी, मसुरे ते आंगणेवाडी ६ गाड्या, चौके, देवली, आंबेरी ते आंगणेवाडी २ गाड्या , देवली ते वायरी मार्गे आंगणेवाडी १ गाडी, वराड ते आंगणेवाडी २ गाड्या , तळगाव, सुकळवाड ते आंगणेवाडी २ गाड्या, तिरवडे, मसुरे ते आंगणेवाडी २ गाड्या , कट्टा, कुणकुवण ते आंगणेवाडी १ गाडी, धामापूर ते आंगणेवाडी २ गाडया धावणार आहेत. तालुक्यातून ४९ बसगाड्या सोडण्यात येणार आहेत. कणकवली आगारातून आंगणेवाडी ३९ गाड्या, अजगणी, असरोंडी मार्गे आंगणेवाडी २ अशा ४१ गाड्या सोडण्यात येणार आहेत. देवगड तालुक्यातील देवगड आगार ते आंगणेवाडी २, आचरा ते आंगणेवाडी ४, हिंदळे, मुणगे ते आंगणेवाडी ३ गाड्या, तर तोंडवली, तळाशील ते आंगणेवाडी १ गाडी, कुडोपी ते आंगणेवाडी १ गाडी, आरे, निरोम ते आंगणेवाडी १ गाडी , आचरा, चिंदर, त्रिंबक ते आंगणेवाडी १ गाडी अशा एकूण १३ गाड्या धावणार आहेत. विजयदुर्ग आगारातून विजयदुर्ग आंगणेवाडी ५ गाड्या तर वेंगुर्ले आजारातून पाट, परुळे (आडारी मार्गे) ते आंगणेवाडी २ बस गाड्या सोडण्यात येणार आहेत. भराडी देवीच्या यात्रेसाठी तयार केलेल्या एसटी आगारांमध्ये नियंत्रण कक्ष तयार करण्यात आले आहेत. या गाड्यांमधून नियमित सवलतही प्रवाशांना मिळणार आहे. एसटीच्या या सेवेचा लाभ भाविकांनी घ्यावा असे आवाहन विभाग नियंत्रक अभिजित पाटील यांनी केले आहे.
आंगणेवाडी यात्रेसाठी एसटीचा सिंधुदुर्ग विभाग सज्ज!, भाविकांच्या सोयीसाठी जादा बस सोडण्यात येणार
By सुधीर राणे | Published: March 01, 2024 4:57 PM