खारेपाटण : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सध्या संपूर्ण देशभर लॉकडाऊन परिस्थिती असल्यामुळे संपूर्ण बाजारपेठा बंद आहेत. यातच नागरिकांना जीवनावश्यक असणाऱ्या वस्तू मिळतानाही खूप प्रयत्न करावे लागणार आहेत. यासाठी कधी कधी व्यापारी वर्ग चढत्या भावाने वस्तू विकत असल्याचे ग्राहकांमध्ये बोलले जात आहे.
अशा परिस्थितीत खारेपाटण येथील नागरिक सिद्धेश तुकाराम करांडे यांचेकडे सुमारे ४५ ते ५० गोणी अतिरिक्त कांदा साठा करुन ठेवल्याचे ग्रामसंनियंत्रण समितीच्या निदर्शनास आले आहे. यामुळे खारेपाटण व्यापारी वर्गात एकच खळबळ उडाली आहे. सरपंच खारेपाटण गाव ग्रामसनियंत्रण समितीचे अध्यक्ष रमाकांत राऊत, सहअध्यक्ष तथा तलाठी रमाकांत डगरे, सचिव तथा ग्रामविकास अधिकारी जी. सी. वेंगुर्लेकर, पोलीस पाटील दिगंबर भालेकर यांनी खारेपाटण बाजारपेठ येथे सोमवारी भेट दिली असता, खारेपाटण येथील चप्पल विक्रीचा व्यवसाय करणारे दुकानदार सिद्धेश तुकाराम करांडे यांच्या घरी गोडावूनमध्ये सुमारे ४५ ते ५० पोती भरलेला लाल कांदा आढळून आला. खारेपाटण सनियंत्रण समितीच्यावतीने कणकवली तहसीलदार यांच्याकडे पुढील कार्यवाहीसाठी पत्रव्यवहार करण्यात आला.खारेपाटण येथे सिद्धेश कारंडे यांनी गोडावूनमध्ये अतिरिक्त कांदा साठवून ठेवला होता.