वेंगुर्ले : भारतीय संस्कृतीचे अविभाज्य अंग असलेल्या योगामध्ये एरोबिक्स, आर्टिस्टिक योग मिलाब करून ओम योग साधनालय वेंगुर्ले विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी डॉ. वसुधा मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली सुंदर असा यौगिक आसनांचा कार्यक्रम सादर केला. यातून भारताचे माजी राष्ट्रपती अब्दुल कलाम यांना अनोख्या पद्धतीने श्रद्धांजली युक्त गुरुवंदना सादर केली.वेंगुर्ले येथील साई मंगल कार्यालयात हा गुरुवंदनेचा कार्यक्रम सादर झाला. यावेळी डॉ. वसुधा मोरे यांनी काळानुसार माणसाला योग साधनेची किती आवश्यकता आहे, हे अनेक उदाहरणे देऊन स्पष्ट केले. दरम्यान, डॉ. वसुधा मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली योग साधना शिकत असलेल्या मुलांनी भारतीय संस्कृतीचे दर्शन घडविणारे योग अविष्कार सादर केले. यामध्ये महिषासूर मर्दिनी स्त्रोत, सावरकरी जयोस्तुते श्री महामंगलेच्या तालावर योगा करीत ‘वंदे मातरम्’ या गितावर एरोबिक्सचा मिलाब घडवून आणला. यावेळी उपस्थितांनीही त्यांच्या या कलागुणांचे कौतुक केले. विशेष म्हणजे महिलांनीही नऊवारी साडीमध्ये रंगमंचावर येऊन सूर्य नमस्काराचे वेगवेगळे प्रकार दाखवून वाहवा मिळविली. या कार्यक्रमात उपस्थित असलेल्या उद्योजक पुष्कराज कोले यांच्या हस्ते ज्येष्ठ गुरुवर्य आर. पी. जोशी यांचा व डॉ. त्रंबक लेले यांचा सत्कार करण्यात आला. मुख्याधिकारी रामदास कोकरे, डॉ. अमृता स्वार यांचा सत्कार मंदाकिनी सामंत यांच्या हस्ते, रांगोळीकार रमेश नरसुले यांचा सत्कार केला व अंबरीश मांजरेकर यांचा सत्कार प्रदीप सावंत यांच्या हस्ते करण्यात आला. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी राजेश घाटवळ, किशोर सोन्सुरकर, सुप्रिया कोरगावकर, मीनाक्षी आरोंदकर, वृंदा मोेर्डेकर, आदींसह इतरांनीही सहकार्य केले. सत्कारमूर्तींनी आपले मनोगत व्यक्त करताना डॉ. मोरे यांच्या या योग प्रशिक्षणाच्या स्तुत्य उपक्रमाचे कौतुक केले. (प्रतिनिधी)
अब्दुल कलाम यांना अनोखी श्रद्धांजली
By admin | Published: August 11, 2015 10:52 PM