कणकवली : उद्धव ठाकरेंनी राजीनामा देऊन देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्री करावे. मग महाराष्ट्रासाठी केंद्रातून मदत आणतो, असे वक्तव्य करणाऱ्या आमदार नितेश राणेंना मी सांगू इच्छितो की विधानसभेत १७० आमदारांचा पाठिंबा असल्यामुळे उद्धव ठाकरे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान झाले आहेत. त्यामुळे ११७ आमदारांचा पाठिंबा असणाऱ्या देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्री बनविण्याची दिवास्वप्ने त्यांनी पाहू नयेत, असा टोला शिवसेनेचे नगरसेवक सुशांत नाईक यांनी आमदार नितेश राणेंना लगावला आहे.याबाबत त्यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, महाराष्ट्राला मदत आणण्यासाठी मुळात या भूमीविषयी मनात नितांत आदर व प्रेम असावे लागते. महाराष्ट्राचा द्वेष करणारे व सत्ता नसल्यामुळे पछाडलेले भाजपचे नेते संकटाच्या व नैसर्गिक आपत्तीच्या काळात फक्त राजकारण करीत आहेत. हे राज्यातील जनता उघड्या डोळ्यांनी पाहत आहे.
महाराष्ट्रात सत्ता असेल तरच केंद्राकडून मदत मिळेल हे भाजपचे आमदार नितेश राणेंनी प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरीत्या स्पष्ट केल्यामुळे नेशन फर्स्टचा मुखवटा घालून फिरणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदींचा खरा चेहरा देशातील जनतेसमोर आला आहे.महाराष्ट्र आणि केरळमध्ये तौउते चक्रीवादळाने थैमान घातलेले असताना फक्त भाजपशासित गुजरात राज्याला एक हजार कोटी रुपये मदतीचे आर्थिक पॅकेज जाहीर करून पंतप्रधान मोदींनी आपण जाहीरपणे राज्याराज्यात भेदभाव करतो याची पुष्टी दिली आहे.मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे आपल्या शब्दाला पक्के आहेत. त्यामुळे भाजपच्या नेत्यांप्रमाणे फसव्या पॅकेजची घोषणा करणे त्यांच्या स्वभावात नाही. देवेंद्र फडणवीसांनी मुख्यमंत्री असताना कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेला निवडणुकीदरम्यान साडेसहा हजार कोटींच्या पॅकेजचे गाजर दाखविले होते. निवडणुका संपल्यानंतर त्यातला एक रुपयासुद्धा दिला नाही.मुख्यमंत्री जिल्ह्यासाठी मदत जाहीर करणारनारायण राणेंनी सिंधुदुर्ग जिल्ह्यात कॅबिनेटची बैठक आयोजित करून कोकणसाठी पाच हजार कोटी रुपयांच्या पॅकेजची घोषणा केली होती. त्यातील पाचशे कोटी तरी मिळाले आहेत का? चक्रीवादळामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यात झालेल्या नुकसानीचा पूर्ण आढावा घेऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे जिल्ह्यासाठी भरीव आर्थिक मदत जाहीर करणार आहेत. फक्त तेवढ्यावरच न थांबता वादळापासून जिल्ह्यातील किनारपट्टीवर सुरक्षिततेच्या दृष्टीने कायमस्वरूपी उपाययोजना करण्यासाठी मुख्यमंत्री कटिबद्ध आहेत, असेही सुशांत नाईक यांनी म्हटले आहे.