राजन वर्धन -- सावंतवाडी सध्या शहरात निर्माण होणारा रोजचा पंधरा ते सतरा टन कचरा गोळा करून शहराबाहेर आंबोली मार्गावर असणाऱ्या कचरा डेपोत संकलित केला जातो. पण या डेपोतील बायोगॅस प्रकल्प चार वर्षे बंद अवस्थेत असल्याने डेपोत हजारो टन कचरा साठून आहे. कचऱ्याच्या समस्येवर जागृती करणाऱ्या पालिका पदाधिकाऱ्यांसह सर्वच घटकाकडून कचरा विल्हेवाटीच्या बायोगॅससह अन्य प्रकल्पांकडेही कानाडोळा करण्यात आला आहे. त्यामुळे डेपो परिसरात दुर्गंधीचे साम्राज्य निर्माण झाले असून स्थानिक नागरिकांसह शहरात आगमन करणाऱ्या पर्यटकांना त्याचा फटका बसत आहे. त्यामुळे कचऱ्याचे शहरातून निर्मूलन झाले पण डेपोतील कचऱ्याच्या विल्हेवाटीचा प्रश्न तसाच आहे. शहरात निर्माण होणाऱ्या कचऱ्याचा डेपो आंबोली मार्गावर आहे. २००९ ला सावंतवाडी कचरा डेपोत बायोगॅसचा प्रकल्पाची सुरूवात करण्यात आली. त्यामुळे या कचऱ्याची विल्हेवाट होऊन यातून बायोगॅस निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात आला. पण हा प्रयत्न केवळ आणि केवळ प्रायोगिक तत्वाप्रमाणेच कार्यरत राहिला. अवघ्या दीड ते दोन वर्षातच तो बंद पडला. त्याकडे त्याच्या दुरूस्तीकडे कुणीच गांभिर्याने पाहिले नसल्याने अजूनही तो बंद अवस्थेत आहे. त्याच्या दुरूस्तीची सुरूवात झाली असल्याचे पालिका प्रशासनामार्फत बोलले जाते पण त्याची पूर्ती कधी होईल? याबाबत मात्र कुणीच काही बोलत नाही. परिणामी विल्हेवाट न झाल्याने कचरा डेपोत हजारो टन कचरा साठून आहे. डेपोच्या अकरा गुंठ्याच्या सर्व जागेत कचऱ्याचे अनेक ढिग निर्माण झाले आहेत. नवीन निर्माण होणाऱ्या कचऱ्याला जागा नसतानाही त्याच डेपोत शहरातील दैनंदिन कचरा डंपींग केला जातोय. डेपोत ओल्या कचऱ्यामुळे या परिसरात मोठी दुर्गंधी पसरली असूून डेपोच्या दारातच ओल्या कचऱ्याच्या खच जमा झाला आहे. शहर स्वागत मार्गावरच हा डेपो असल्यामुळे स्थानिक नागरिकांसह पर्यटकांनाही याचा त्रास सहन करावा लागत आहे. पालिकेचे कर्मचारी अशाही अवस्थेत या कचरा डेपोत डंपींग करण्यात आलेला कचरा ओढण्याचे व त्याची विभागणी करण्याचे काम करत आहेत. त्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने आवश्यक सुविधांचीही कमतरता आहे. पालिका प्रशासनाने कचरा निर्मूलनासाठी नागरिकांचे पाठबळ मिळविण्यासाठी यशस्वी पाठपुरावा सुरू आहे. पण प्रकल्पाबाबतची चालढकल मात्र गांभिर्याने घेतली नाही. परिणामी डेपोतून निर्माण होणाऱ्या दुर्गंधीतून पर्यावरणासह आरोग्यावर विपरीत परिणाम होण्याचीही शक्यता आहे. वास्तविक कचरा निर्मूलन महत्त्वाचे असले तरी कचऱ्याची विल्हेवाटही महत्त्वाचीच आहे. त्याचा प्रामुख्याने पाठपुरावा करणे अत्यावश्यक आहे. पालकमंत्र्यांचा पुढाकार हवापालकमंत्री दीपक केसरकर यांच्या मार्गदर्शनाखाली सावंतवाडी नगरपरिषदेचे आश्वासक वाटचाल सुरू आहे. कचरा विल्हेवाट प्रकल्पाबाबत त्यांनीच पुढाकार घेतल्यास संकलित कचऱ्याची विल्हेवाट लावणे शक्य होईल.सध्या कचरा विल्हेवाटीसाठी पालिका प्रशासनाकडून गांडूळ खताचे दोन प्रकल्प कार्यान्वीत करण्यात आले असून स्मशानभूमीतील प्रकल्प पूर्ण क्षमतेने कार्यरत आहे. तर उद्यानातील प्रक ल्प मंद गतीने कार्यरत आहे. कचरा डेपोतील बायोगॅस प्रकल्पाचे काम अंतिम टप्यात आले असून महिना अखेरीस हा प्रकल्प कार्यान्वीत होण्याची शक्यता आहे. नागरिकांचे चांगले सहकार्य मिळते पण कचऱ्याची विभागणी केल्यास कचरा विल्हेवाट सोपी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे त्यादृष्टीने पालिका प्रशासनाचे प्रयत्न सुरू आहेत.- विजयकुमार व्दासे,मुख्याधिकारी, सावंतवाडी नगरपरिषदकचऱ्याच्या समस्येवर पालिका प्रशासन गंभीर असून कचऱ्याचे निर्मूलन करण्यासाठी नागरीकांचे मोठे सहकार्य मिळत आहे. यामुळेच आज शहराला सुंदर शहराचा मान मिळाला आहे. कचरा विल्हेवाट प्रकल्पाची समस्या राज्यातील सर्वच शहरांना भेडसावत असल्याचे मत मुख्यमंत्री यांनीही जाहीर केल्याने एखादा प्रकल्प आणून त्याचा कसलाही भार नागरिकांच्या माथ्यावर टाकण्याची घाईगडबड केली जाणार नाही. सध्या पालिकेला शहरातील सांडपाण्यावर प्रक्रिया करण्याचा ८२ लाख रकमेचा प्रकल्प मंजूर झाला आहे. त्यामुळे अभ्यासपूर्णतेनेच असे प्रकल्प राबविण्याचा पालिकेचा प्रयत्न आहे. - बबन साळगावकर,नगराध्यक्ष, सावंतवाडी
हजारो टन कचरा साठल्याने डेपो परिसरात दुर्गंधीचे साम्राज्य
By admin | Published: January 09, 2016 12:12 AM