वैभववाडी : राष्ट्रीय ग्रामस्वराज्य कार्यक्रमांतर्गत झालेल्या प्रशिक्षण कार्यक्रमाच्या उपस्थिती नोंदवहीवर समाजकल्याण सभापती, उपसभापती आणि एक पंचायत समिती सदस्य यांच्या खोट्या स्वाक्षऱ्या निर्दशनास आल्यामुळे सर्वांना धक्काच बसला आहे.
या प्रकाराची गंभीर दखल घेत खोट्या स्वाक्षऱ्या करून दुरूपयोग करणाऱ्यांवर फौजदारी गुन्हा दाखल करावा, अशी मागणी चौकशी अधिकाऱ्यांसमोर केली. दरम्यान, प्रशिक्षण खर्चाच्या चौकशीच्या अनुषंगाने सभापती, उपसभापती आणि पंचायत समिती सदस्य व काही पुरवठादारांचे जबाब नोंदविण्यात आले.राष्ट्रीय ग्रामस्वराज्य अभियानांतर्गत १५ व १६ नोव्हेंबर २०१९ रोजी पंचायत समिती स्तरावरील प्रशिक्षण कार्यक्रम पंचायत समितीच्या सभागृहात झाला होता. दोन दिवसीय या प्रशिक्षणावर १ लाख ३१ हजार ५०० रुपये खर्च झालेला आहे. परंतु या प्रशिक्षण खर्चासंदर्भातील माहिती उघड झाल्यानंतर सर्वांना धक्काच बसला. पंचायत समितीच्या मालकीच्या साऊंड सिस्टीम, प्रोजेक्टर, व्हिडिओ शुटिंग कॅमेरा यावर खोटी बिले जोडून हजारो रुपये उकळले. याशिवाय स्टेशनरीत हजारो रुपयांचा अपहार झाला आहे.चहा, नाश्ता, जेवण यांचा मक्ता प्रत्यक्षात २२ हजार ५०० रुपयांना देऊन त्याच्यावर ४१ हजार ५०० रुपये हडप करण्यात आले. या सर्व प्रकाराची गंभीर दखल पंचायत समितीच्या पदाधिकाऱ्यांनी घेतल्यानंतर या प्रकरणाची चौकशी उपमुख्यकार्यकारी अधिकारी दीपाली पाटील यांनी केली होती.
परंतु पदाधिकाऱ्यांनी सभेत सूचना केल्यानंतरदेखील पदाधिकाऱ्यांनी चौकशी अधिकारी चौकशीस येणार असल्याची माहिती दिली नव्हती. हेतूपुरस्सर पदाधिकाऱ्यांना अंधारात ठेवले असा आरोप करीत सर्व सदस्यांनी सभात्याग केला होता. या सभेचे इतिवृत्त आणि सभापती अक्षता डाफळे यांनी स्वतंत्र पत्राद्वारे फेरचौकशीची मागणी केली होती.त्यानुसार चौकशी अधिकारी तथा उपमुख्यकार्यकारी अधिकारी दीपाली पाटील बुधवार ९ रोजी दुपारी ३ वाजता सभापती दालनात आल्या. यावेळी सभापती अक्षता डाफळे, समाजकल्याण सभापती शारदा कांबळे, उपसभापती दुर्वा खानविलकर, अरविंद रावराणे, लक्ष्मण रावराणे, मंगेश लोके आदी उपस्थित होते.
चौकशीला सुरुवात करण्यापूर्वी पदाधिकाऱ्यांनी चौकशी अधिकाऱ्यांना ज्या सभागृहात प्रशिक्षण झाले त्या सभागृहात नेले. तेथील साऊंड सिस्टीम, प्रोजेक्टर त्यांच्या निर्दशनास आणून दिला. त्यानंतर सभापती दालनात पदाधिकाऱ्यांसमोर चौकशीला सुरुवात झाली.
समाजकल्याण सभापती शारदा कांबळे, उपसभापती दुर्वा खानविलकर आणि पंचायत समिती सदस्य मंगेश लोके यांनी आपण प्रशिक्षणाला उपस्थित नव्हतो. तरीदेखील आमच्या खोट्या स्वाक्षऱ्या उपस्थिती नोंदवहीमध्ये आहेत.या सह्या आमच्या नाहीत. त्यामुळे आमच्या स्वाक्षऱ्या करून आमच्या पदाचा दुरूपयोग केलेला आहे. ही गंभीर बाब असून या स्वाक्षऱ्या करणाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करावेत, अशी लेखी मागणी केली. याशिवाय प्रशिक्षणात खर्चातील प्रत्येक मुद्यावर पदाधिकाऱ्यांनी आक्षेप नोंदविले. चहा, नाश्ता, जेवण, स्टेशनरी, बॅनर आणि इतर सर्व मुद्यांवर पदाधिकाऱ्यांनी आक्षेप नोंदविला.प्रशिक्षण खर्चातील गौडबंगाल आता सर्वांसमोरचहा, नाश्ता, जेवण पुरविणाऱ्या उन्नती शेतकरी बचतगटाचे अध्यक्ष इंद्रजित परबत्ते यांचा जबाब घेण्यात आला. त्यांनी आपण एक दिवस शाकाहारी आणि एक दिवस चिकन जेवण दिल्याचे मान्य केले. याशिवाय चहा आणि नाश्ता दिला. त्यापोटी २२ हजार ५०० रुपये आपल्याला देण्यात आले. परंतु प्रत्यक्षात ४१ हजार ५०० रुपयांचा धनादेश देण्यात आला होता.
प्रशिक्षणाच्या इतर रकमेचा त्या देयकात समावेश असल्याचे सांगत पंचायत समितीच्या एका कर्मचाऱ्याने ६ हजार तर दुसऱ्या कर्मचाऱ्याने १३ हजार रुपये आपल्याकडून नेल्याचे सांगितले. त्यामुळे या प्रशिक्षण खर्चातील गौडबंगाल आता सर्वांसमोर आले आहे.