दापोली : तालुक्यातील हर्णै राजवाडी येथे जून २०१० साली घरावर दरड कोसळून कुटुंबातील आठ सदस्य डोंगराच्या मलब्यात गाडले गेले होते. यामध्ये उद्ध्वस्त झालेल्या पवार कुटुंबियांची घरासाठी सुरू असलेली परवड अद्याप पाठ सोडण्यास तयार नाही. या दुर्घटनेला ५ वर्षे झाली तरी अद्याप पवार कुटुंबियांच्या घराची प्रतिक्षा संपलेली नाही. शासनासह येथील राज्यकर्त्यांनी सध्यातरी या आपद्ग्रस्ताना वाऱ्यावर सोडल्याचे विदारक चित्र आहे. दाभोळ येथे भूस्खलन होऊन ५ जण ठार झाल्याने हर्णै - राजवाडीच्या आठवणी पुन्हा जाग्या झाल्या आहेत.जून २०१०मध्ये हर्णै - राजवाडीत दरड कोसळून आठ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. या दुर्दैवी दुर्घटनेत रवी पवार, पार्वती पवार व सिध्दार्थ बोथरे या तिघांचा जीव वाचला होता. ही भयंकर घटना घडल्यानंतर मदतीचे अनेक हात पुढे सरसावले होते. मात्र, जसजसे दिवस सरले तसे साऱ्यांच्या डोळ्यातील अश्रूही आटले. या दुर्घटनेत पवार कुटुंबियांचे घरच नष्ट झाले होते. त्यांच्या घराचे स्वप्न पूर्ण होण्याचा मार्ग दृष्टीपथात येत असतानाच धोकादायक म्हणून जाहीर झालेल्या सर्वांना जागा मिळावी, असा आग्रह झाल्याने पवारांच्या घराचे स्वप्न स्वप्नच राहिले आहे. या घटनेचा पाठपुरावा केल्यावर तीन वर्षांपूर्वी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष विजय भोसले यांनी तडक घटनास्थळी धाव घेऊन पवार कुटुंबियांना धीर दिला होता. त्यांना आर्थिक मदतही दिली होती. यावेळी त्यांनी पवार यांच्या नावे वेगळा व नूतन प्रस्ताव तयार करून त्याचा पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, हर्णै ग्रामपंचायतीकडे अतिरिक्त जागा शिल्लक नसल्याने जिल्हा परिषदेकडे प्रस्ताव पाठवूनही पवार यांना भाड्याच्या घरात राहून आपला उदरनिर्वाह चालवावा लागत आहे. जिल्हा परिषदेने पवार यांच्या घरासंदर्भात हालचाली करून त्यांचे स्वत:च्या घरात राहण्याचे स्वप्न पूर्ण करावे, अशी मागणी हर्णैतून होत आहे. याबाबत हर्णैचे सरपंच महेश पवार यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी वस्तुस्थिती मान्य केली. या धोकादायक भागात राहणाऱ्या सर्वांकरिता शासनाने हर्णै बायपास रस्त्यावर जागा देऊ केल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. मात्र, ही जागा मुख्य गावापासून लांब असल्याने कुटुंबाच्या दृष्टिने ती गैरसोयीची आहेत. दरवर्षीर् या धोकादायक जागेत राहणाऱ्यांना शासनाच्यावतीने नोटीस बजावूनही काही उपयोग होत नाही. यामुळे या धोकादायक दरडींच्या टांगत्या तलवारीखाली राहणाऱ्यांना ग्रामपंचायतीने पावसाळ्यात नोटीस बजावणे यावर्षीपासून बंद केल्याचे त्यांनी स्पष्ट केले. यामुळे येथील लोकांच्या जागेचा प्रश्न या पावसाळ्यानंतरही निकाली निघण्याची आशा मावळली आहे. दापोली तालुक्यातील दरडग्रस्त गावांमध्ये समावेश असलेल्या अशा गावांमधील आपदग्रस्त कुटुंबांची चाललेली फरफट काही केल्या संपत नसल्याने अशा कुटुंबांच्या समोरील काळोख दूर कधी होणार याचीच प्रतीक्षा आहे. (प्रतिनिधी)
आपद्ग्रस्त कुटुंबियांची शासनाकडून फरफटच
By admin | Published: June 26, 2015 11:16 PM