कुडाळ : कुडाळ तालुक्यात हिर्लोक, आंबेडकरवाडी येथे एका घरात आठ फूट खोल खड्डा खणून अघोरी पूजा करण्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी पोलिसांनी एका दाम्पत्यासह पाच जणांना ताब्यात घेतले आहे. गृहदोष आणि मूल होत नसल्याने ही अघोरी पूजा होत असल्याचे तपासात निष्पन्न होत आहे. याप्रकरणी कुडाळ पोलिस कसून तपास करत आहेत. आठ फूट खोल खड्डा का करण्यात आला? यामागे नेमका उद्देश काय ? याचा उलगडा मात्र अद्याप झालेला नाही.याबाबत कुडाळ पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हिर्लोक, आंबेडकरवाडी येथील विशाल विजय जाधव या व्यक्तीच्या राहत्या घरात काहीतरी संशयास्पद हालचाली असून घरात कोणती तरी जादूटोणा करणारी अघोरी कृती चालल्याचा दाट संशय आहे, अशी माहिती पोलिसांना मिळाल्याने पोलिस हवालदार मंगेश जाधव यांनी हिर्लोक-आंबेडकरवाडी येथे विशाल जाधव याच्या राहत्या घरात जाऊन खातरजमा केली. त्यावेळी घरात सुमारे ४ X ४ X ८ लांबी-रुंदी आणि खोलीचा खड्डा खणलेला आढळला. अनिष्ट प्रथेचा वापर करून जादूटोणा करणारे साहित्य सुद्धा आढळून आले. यामध्ये लिंबू, पान सुपारीचे विडे, हळद, पिंजर, नारळ, फळे, फुले, तिळ, बर्फीचे पुडे, पणत्या, अबीर, डमरू, रुद्राक्ष माळ, चामड्याचे छोटे चप्पल जोड, पांढरे कापड, गांधी टोप्या, बाजूला छोट्या काठ्या, कांबळी, घोंगड्याचे तुकडे, कवडे, बिब्बे अशा साहित्याची मांडणी करून नरबळी अगर अन्य कोणत्या तरी अघोरी कृतीकरिता कोयता आणि सुरी, अशी हत्यारे मांडणी केलेल्या स्थितीत दिसून आली.
आवळेगाव दूरक्षेत्राच्या पोलिसांनी पोलिस निरीक्षक राजेंद्र मगदूम यांना ती हकीकत कळवली. पोलिस निरीक्षक राजेंद्र मगदुम, उपनिरीक्षक प्रमोद वाघाटे, हवालदार कृष्णा केसरकर, प्रीतम कदम, अनिल पाटील, ज्योती रायशिरोडकर यांनी घटनास्थळी जाऊन वस्तुस्थितीची खात्री केली. त्यावेळी घरात संशयित आरोपी विशाल विजय जाधव (३०, रा. घर नं. ३५३, हिर्लोक, आंबेडकरवाडी) सध्या राहणार ठाणे पश्चिम, सुस्मिता मिलिंद गमरे (३३, रा. मु.पो. पातेपिलवली, धर्मवीर नगर, साईनिवास सोसायटी, ता. चिपळूण जि. रत्नागिरी), हर्षाली विशाल जाधव पूर्वाश्रमीची समृद्धी अविनाश हडकर, (३५ रा. हिर्लोक, आंबेडकरवाडी) अविनाश मुकुंद संते (३२, रा. उसरघरगांव, मानपाडा, दिवारोड, डोंबिवली (पूर्व) व दिनेश बालाराम पाटील (३४ वर्षे, रा.उसरघरगांव, मानपाडा, दिवारोड, डोंबिवली (पूर्व) हे होते.घटनास्थळी येण्या-जाण्याकरिता वापरलेली कार जप्तत्यांच्याकडे एवढा मोठा खड्डा खोदण्याचे कारण पोलिसांनी विचारले असता विशाल जाधव याचे घरास गृहदोष असल्याने तसेच त्याच्या पत्नीस मुलबाळ होत नसल्याने त्यांची पिडा दूर करण्यासाठी अघोरी पूजा केल्याचे सांगितले. परंतु ते समाधानकारक माहिती देत नसल्याने गुन्ह्याच्या सखोल अन्वेषणाकरिता सर्व आरोपींना अटक करण्यात आली. तसेच आरोपींनी घटनास्थळी येण्या-जाण्याकरिता वापरलेली इको कार (क्रमांक एम.एच.०५-ईव्ही६५६१) ही जप्त करण्यात आली आहे. पोलिस हवालदार मंगेश जाधव यांनी या घटनेबाबत तक्रार दिलेली आहे. अधिक तपास पोलिस निरीक्षक राजेंद्र मगदूम हे करीत आहेत.
जादूटोणा करणाऱ्या व्यक्तींचा वावर वाढतादरम्यान, काही वर्षांपूर्वी झालेले मालवण तालुक्यातील नांदोस हत्याकांड ताजे असतानाही जिल्ह्यात अशाप्रकारे परजिल्ह्यातून आलेल्या तंत्र मंत्र, जादूटोणा करणाऱ्या व्यक्तींचा वावर वाढत आहे. शहरातील शिकली सवरलेली माणसे देखील अशा अंधश्रद्धांना बळी पडत आहेत याबाबत आश्चर्य व्यक्त होत आहे.
खड्ड्याच्या रहस्याचा उलगडा नाही !या पूजेदरम्यान मोठा खड्डा खोदण्यात आला असून तो का खोदण्यात आला याची माहिती पोलिस संबंधित संशयितांकडून घेत आहेत. मात्र, याबाबत योग्य ती माहिती अजूनही मिळत नसल्याने खड्ड्याचे रहस्य अजूनही उलगडलेले नाही.