कणकवली : आपत्ती व्यवस्थापन करताना स्वत:चा जीव सांभाळून आपत्तिग्रस्तांना मदत करणे आवश्यक असते, आपत्ती व्यवस्थापनाचे मुख्य ध्येय हे जीव वाचविणे हे असते. एक जीव वाचविल्यामुळे एका कुटुंबाला आधार मिळतो. प्रथमोपचार करताना अपुऱ्या ज्ञानाने उपचार केल्यास एका आपत्तीचे निवारण करताना दुसरी आपत्ती निर्माण होणार नाही, याची जाणीव असणे आवश्यक आहे. जग फार सुंदर आहे, तसेच जीवन अनमोल आहे, हे युवा पिढीने लक्षात ठेवणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन प्रवीण सुलोकार यांनी केले. फोंडाघाट एज्युकेशन सोसायटीच्या कला आणि वाणिज्य महाविद्यालयामध्ये आपत्ती व्यवस्थापनाची कार्यशाळा नुकतीच झाली. या कार्यशाळेत जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण जिल्हा सिंधुदुर्गचे प्रवीण सुलोकार आणि भिकाजी मर्दाने यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रा. डॉ. संतोष रायबोले म्हणाले, आपत्ती ही कोणत्याही क्षणी येऊ शकते. आपत्तीला सामोरे जाण्यासाठी प्रशिक्षणाची आवश्यकता असते. या प्रशिक्षणाचा महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी उपयोग करून घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले. आपत्ती व्यवस्थापनाच्या कार्यशाळेस राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे प्रमुख प्रा. विनोद पाटील यांनी प्रास्ताविक केले. प्रा. विद्या मोदी यांनी स्वागत केले. यावेळी महाविद्यालयातील विद्यार्थी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. (प्रतिनिधी)\\प्रथमोपचार कसे करावेत...सुलोकार यांनी, कोकणात सर्पदंश होण्याचे प्रमाण मोठे आहे. सर्पदंश झाल्यानंतर कशाप्रकारे प्रथमोपचार करावेत, याबाबत विद्यार्थ्यांना त्यांनी माहिती दिली.
जीव वाचविल्यामुळे कुटुंबाला आधार मिळतो
By admin | Published: December 10, 2014 7:27 PM