कुडाळ : पिंगुळी- नवीवाडी येथील राऊळ कुटुंबियांच्या घराच्या भिंती कोसळल्या. या दुर्घटनेतून घरातील माणसे आणि गणेशमूर्तीही सुखरूप राहिली. त्यामुळे बाप्पाच्या कृपेमुळेच विघ्न टळल्याच्या भावना यावेळी राऊळ कुटुंबीयांनी व्यक्त केल्या. दरम्यान, पूर्ण घर कोसळण्याच्या स्थितीत असल्यामुळे राऊळ कुटुंबियांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करावे लागणार आहे.पिंगुळी- नवीवाडी येथील राजन राऊळ व विनायक राऊळ यांचे घर आहे. गणपती सणानिमित्त त्यांच्या कुटुंबातील मुंबईस्थित व्यक्तीही पिंगुळी येथील घरी आल्या होत्या. शुक्रवारी या सर्वांनी मंगलमय वातावरणात गणपतीची प्रतिष्ठापना केली. शनिवारी सकाळी सर्वांनी बाप्पाची पूजाअर्चा केली. काहीजण नैवेद्याच्या तयारीला लागले असतानाच १०.३० वाजण्याच्या सुमारास घराच्या एका बाजूच्या मोठ्या भिंती कोसळल्या.यावेळी घरामध्ये राऊळ कुटुंबियांची नऊ माणसे काम करीत होती. भिंत कोसळताच सर्वांनी सुरक्षित ठिकाणी धाव घेतली. त्यामुळे कोणीही जखमी झाले नाही. ज्या बाजूच्या भिंती कोसळल्या, त्यालाच लागून गणेशाच्या मूर्तीचे पूजन करण्यात आले होते. मात्र, गणपती असलेल्या भिंतीला धोका पोहोचला नाही. छपराची काही कौलेही गणपतीच्या खोलीत पडली. परंतु मूर्तीला कोणतेही नुकसान झाले नाही. राऊळ कुटुंबीयांचे हे घर पडण्याच्या स्थितीत असल्याने त्यांना दुसरीकडे रहावे लागणार आहे. दरम्यान, घर धोकादायक स्थितीत असल्याने गणपतीचे दीड दिवसांनी विसर्जन करण्यात आले. घटनास्थळी मनसेचे हेमंंत जाधव, बाबल गावडे, दीपक गावडे, तलाठी यांनी भेट दिली. (प्रतिनिधी)
भिंत कोसळूनही बाप्पासह घरातील मंडळी सुखरुप
By admin | Published: August 31, 2014 12:31 AM