दोडामार्ग (सिंधुदुर्ग) : तुम्ही अधिकारी व प्रशासनाने आम्हा शेतकऱ्यांची चार वर्षांपासून थट्टा चालविली आहे. तिलारी धरणाच्या डाव्या कालव्याचे पाणी आमच्या शेतजमिनीत पोहोचावे, या मागणीसाठी उपोषणाचा इशारा दिला व बातमी आली की, तुम्ही काम करता. तुमच्या शब्दांवर आम्ही वारंवार उपोषणे मागे घेतली. मात्र, आता आम्ही तुमच्या भूलथापांना बळी पडणार नाही. नुकसानभरपाई न मागता आम्ही शेतकऱ्यांनी फक्त पाणी मिळावे यासाठी स्वतःच्या जमिनी दिल्या. मात्र, तुम्ही शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसण्याचे काम करत आहात. आम्हाला वाद नको, स्टंटबाजीही नको. आम्हाला फक्त पाणी हवे, अशी मागणी झरेबांबर येथील उपोषणकर्ते शेतकऱ्यांनी केली.झरेबांबर येथे तिलारी डाव्या कालव्यातून पाइपलाइनद्वारे शेतात पाणी नेण्याच्या कामात वारंवार दिरंगाई होत आहे. त्यामुळे संतप्त शेतकरी व ग्रामस्थांनी अनेक वेळा आंदोलने, उपोषणे केली. मात्र, प्रत्येक वेळी या शेतकऱ्यांची फसवणूक करण्याचे काम अधिकाऱ्यांनी केले. परिणामी, तिलारी पाटबंधारे विभागाच्या फसवणुकीला वैतागून झरेबांबर- आंबेली सरपंच अनिल शेटकर यांनी कालव्याच्या पाण्यात जलसमाधी घेण्याचा इशारा दिला होता. त्यानुसार सकाळी १०:३० वाजेच्या सुमारास सरपंच शेटकर, ग्रामस्थ व शेतकरी कालव्याजवळ जमा झाले. यावेळी पाटबंधारे विभागाचे कनिष्ठ अभियंता म्हेत्रे व पोलिसही दाखल झाले.
कार्यकारी अभियंत्यांवर प्रश्नांचा भडिमारकनिष्ठ अभियंता म्हेत्रे यांनी जलसमाधी न घेण्याबाबत विनंती केल्याने कालव्याजवळच ठिय्या आंदोलन केले. म्हेत्रे यांच्यावर उपोषणकर्त्यांनी प्रश्नांची सरबत्ती केली. मात्र, त्यांच्याकडून समर्पक उत्तर येत नसल्याने सरपंच व शेतकऱ्यांनी कालव्याजवळच ठिय्या आंदोलनास सुरुवात केली. शिवाय तुमच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना येथे बोलाविण्याची मागणीही केली. दुपारी ३ वाजेच्या सुमारास कार्यकारी अभियंता विनायक जाधव हे आंदोलन स्थळी दाखल झाले. त्यांच्यावर प्रश्नांचा भडिमार करत चार ते आठ वर्षे पाण्यासाठी वाट का पाहावी लागते? असा सवाल उपस्थित केला. यावेळी विनायक जाधव हे अनुत्तरित झाले. अखेर विनायक जाधव यांनी मंगळवारी संबंधित कामाबाबात आढावा घेऊन बुधवारी बैठक घेण्याचे सांगितल्याने सायंकाळी उशिरा उपोषण मागे घेतले.