चिपळूण : महसूल विभागाने पंचनामे करण्यात हलगर्जीपणा केल्यामुळे अनेक शेतकरी आंबा व काजू नुकसानीपासून वंचित राहिले आहेत. पंचनामे करण्याची जबाबदारी महसूल खात्यावर असताना त्यांनी कृषी खात्याला नाहक वेठीस धरले आणि त्यामुळेच पंचनामे वेळेवर होऊ शकले नाहीत. तरीही सर्व शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी, अशी मागणी करण्यात आली. चिपळूण पंचायत समितीची मासिक सभा सभापती समीक्षा बागवे यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी छत्रपती शिवाजी सभागृहात झाली. सभेचे प्रास्ताविक गटविकास अधिकारी प्रकाश भोसले यांनी केले. अवकाळी पावसामुळे आंबा व काजू पिकाचे नुकसान त्याचे रितसर पंचनामे कृषी विभागाने केले. २८०० पंचनामे झाले असताना महसूल विभागाने १७०० हेक्टर क्षेत्राचेच पंचनामे देण्यास सांगितले. त्यामुळे उर्वरित पंचनामे कृषी विभागाकडेच राहिले आहेत. ३१ मार्चपर्यंत मुदत देऊन पंचनामे स्वीकारण्यात न आल्याने शेतकरी नुकसान भरपाईपासून वंचित राहिले आहेत. याबाबत दिलीप मोरे, अभय सहस्त्रबुध्दे, चंद्रकांत जाधव, संतोष चव्हाण यांनी प्रश्न उपस्थित केले. कृषी सहाय्यक जगताप यांनी समर्पक उत्तरे देण्याचा प्रयत्न केला. मुळात पंचनामा करणे हे महसूल विभागाचे काम आहे. अल्प कालावधीत आम्ही पंचनामे केले व सादर करताना ते घेतले गेले नाहीत, त्यामुळे २३ मार्चपर्यंतची यादी ग्राह्य धरुन नुकसान भरपाई देण्यात येत आहे, असे स्पष्टीकरण त्यांनी दिले. लोकांना नुकसान भरपाई न मिळाल्याने त्यांचे हाल झाले आहेत. गावागावात अर्ध्या लोकांना नुकसान भरपाई मिळाल्याने वाद निर्माण झाले आहेत. नाहक भांडणे लावण्याचे काम झाले आहे. त्यामुळे सर्वसामान्य शेतकरी हवालदिल आहे. महसूल विभागाने सर्व शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी करण्यात आली. तसेच येगाव शाळेतील झाडांची चोरी झाल्याचा विषय संतोष चव्हाण यांनी मांडला. मात्र, तसे झाले नसल्याचे गटशिक्षणाधिकाऱ्यांनी सांगितले. ढाकमोली, चिंचवाडी, गुळवणे ही वाहतूक वळवण्यात आली आहे, तर गोवळकोट एस. टी. बंद असल्याने तेथील मिडीबस सुरु करावी. तसेच चिपळूण - लोटे - आवाशी ही शटल सेवा सुरु करावी, अशी मागणी करण्यात आली. कुटरे येथे डिझेल चोरीप्रकरणी एस. टी.च्या चालक व वाहकावर दंडात्मक कारवाई करण्यात आली. या चालक वाहकाला ग्रामस्थांनी मदत केल्याने ते दंड भरु शकले. परंतु, ओसाड माळरानावर राहून प्रवाशांना सेवा देणाऱ्या चालक, वाहकांवर अशी कारवाई करु नये. डिझेल चोरीप्रकरणी चौकशी करुन कारवाई करावी. याप्रकरणी पंचनामा झाला असून, त्यानुसार कारवाई करावी. परंतु, चालक वाहकांना यात नाहक त्रास देऊ नये, अशी मागणी सदस्य चव्हाण, सहस्त्रबुध्दे, मोरे यांनी केली. (प्रतिनिधी)भरपाईवरुन वाद वाढले...गोवळकोट मिडीबस सुरु करण्याची मागणी.आवाशी शटल सेवा सुरु करावी. नुकसान भरपाईवरुन गावागावात वाद वाढले.अनेक शेतकरी नुकसानीपासून वंचित. येगाव शाळेत झाडांची चोरी.अवकाळी पावसामुळे आंबा, काजू पिकांचे नुकसान.नुकसानाचे अल्प कालावधीतच पंचायत समितीच्या कृषी विभागाने केले पंचनामे.
चिपळुणात शेतकरी भरपाईला मुकले
By admin | Published: August 19, 2015 11:40 PM