शिवाजी गोरे - दापोली -कोकणातील आंबा, काजूची गुणवत्ता व उत्पादकता वाढवण्यासाठी डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाने राष्ट्रीय कृषी विकास योजनेंतर्गत नवोन्मेषी जलस्रोत विकास प्रकल्प राबवण्याचा निर्णय घेतला आहे. रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यात २० शेततळी प्रात्यक्षिक म्हणून तयार करण्यात येणार आहेत. कुलगुरु डॉ. व्यंकटेश्वरलू यांच्या हस्ते मोहिमेच्या प्रकल्पाचे भूमिपूजन झाले. कृषी उत्पादकता वाढवण्यासाठी डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाने काही शिफारसी केल्या होत्या. या शिफारशींचा एकत्रित विचार होऊन उत्पादकता वाढवण्यासाठी शेततळे, मायक्रो एरिगेशन, सोलर पंप, पाईपलाईनद्वारे पाणी उचलणे, ठिबक सिंचन, स्पींकलर या शिफारसी कृषी विद्यापीठाच्या शास्त्रज्ञांनी संशोधनातून केल्या होत्या.कोकणातील आंबा, काजू बागायतदार शेतकरी बागेला पाणी देत नाहीत. पारंपरिक पद्धतीने आंबा काजूचे पीक घेतले जाते. त्यामुळे उत्पादकतेवर परिणाम होतो. बागेला एरिगेशन करुन पाणी दिल्यास आंबा व काजूच्या उत्पादनात दीड पट वाढ होऊ शकते, हे कृषी फळबागांतून शास्त्रज्ञांनी संशोधनातून सिद्ध केले आहे. पाणी दिल्यामुळे जिरायती, बागायती, फळबागातील उत्पादनात वाढ होते. त्याकरिता नवोन्मेषी जलस्रोतांची गरज आहे.आंबा बागेला पाणी दिल्यास आंब्याची चव बदलते किंवा आंब्यात साका निर्माण होतो. फुलगुरु, छोटी फळगळ होते. काजूलासुद्धा पाणी देण्याची गरज नाही. काजूला पाणी दिल्यास फुलांची गळती होते, असा समज आहे. परंतु हे चुकीचे असून, शास्त्रज्ञांनी सुचवलेल्या शिफारशींचे पालन केल्यास बागायतदाराला फायदा होणार आहे. उत्पादन वाढीसाठी आंबा-काजू बागेला पाणी देण्याची संकल्पना बागायतदारांमध्ये रुजावी, यादृष्टीने हालचाली सुरु झाल्या असून, ज्या शेतकऱ्याच्या नावावर ७ वर्षांपेक्षा अधिक वयाच्या आंबा, काजू बागा आहेत. ज्यांच्या नावावर सातबारा आहे, अशा बागायतदारांच्या बागेत २०Ÿ२० मीटर साडेतीन मीटर खोल तळी तयार करण्यात येणार आहेत. अडीच लाख रुपये खर्चून ही तळी बांधण्यात येणार आहेत. खोदाईनंतर अस्तरीकरण व बांधून पाईपलाईन व पंप बसवण्यात येणार आहे. पाईपलाईन व पंपाचा खर्च वेगळा आहे. याकरिता शेतकऱ्याला एकही रुपया खर्च येणार नाही. शेतकऱ्यांना प्रशिक्षण मार्गदर्शन, शेततळ्यावर घेण्यात आलेल्या पिकाच्या मूल्यमापनातून उत्पादन वाढीचे प्रात्यक्षिक दाखवले जाणार आहे.आघाडी सरकारच्या काळात कृषी दर वाढवण्यासाठी शास्त्रज्ञांनी काही शिफारसी केल्या होत्या. कृषी दर वाढवण्यासाठी शास्त्रज्ञांच्या शिफारसीचा पाठपुरावा म्हणून ही मोहीम हाती घेण्यात आली आहे.राष्ट्रीय कृषी विकास योजनेकडून कृषी उत्पादकता वाढीसाठी नवोन्मेषी जलस्रोत विकास प्रकल्पाकरिता पहिल्या टप्प्यात ५ कोटी रुपये मिळणार आहेत. कोकण कषी विद्यापीठाच्या अखत्यारीतील आंबा, काजू बागांची गुणवत्ता व उत्पादकता वाढवण्याच्या हालचाली सुरु झाल्या असून, कृषी विद्यापीठाचे मृद आणि जलसंधारण अभियांत्रिकी विभाग व कृषी विद्यापीठ बांधकाम विभागांमार्फत जलस्रोत विकास प्रकल्पाचे काम केले जाणार आहे.कृषी विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरु डॉ. व्यंकटेश्वरलू यांनी काही सुधारणा सुचवल्या आहेत. कृषी उत्पादकता वाढवण्यासाठी बागायतींप्रमाणे भाजीपाला लागवडीसाठीसुद्धा ३०Ÿ३० रुंद साडेतीन मीटर खोल ३ लाख रुपये खर्चून भाजीपाला बागायती व जिरायती शेतीला पाणी पुरवठा करण्यासाठी शेततळी तयार करण्यात येणार आहे. यावेळी कुलगुरु डॉ. व्यंकटेश्वरलू, संशोधन संचालक डॉ. उत्तमकुमार महाडकर, शिक्षण संचालक डॉ. आर. जी. बुरटे, विस्तार शिक्षण संचालक डॉ. संजय भावे, विद्यापीठ अभियंता वि. दा. कोळी, विद्यापीठ नियंत्रक एस. ए. शेट्ये, अधिष्ठाता अभियांत्रिकी डॉ. एन. जे. ठाकोर, उपप्रमुख संशोधक डॉ. एस. बी. नांदगुडे, विद्यापीठ अभियंता आर. ए. धनावडे, बांधकाम अधीक्षक श्रीकांत आंबेकर उपस्थित होते.उत्पादन वाढीसाठी बागेला पाणी आंबा, काजूच्या बागायतींना पाणी देण्यावरून शेतकऱ्यांमध्ये काही गैरसमज आहेत. मात्र, डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाने विद्यापीठ प्रक्षेत्रात अशा प्रकारची शेततळी तयार करुन एरिगेशनच्या माध्यमातून अधिक उत्पादन घेतले आहे. विद्यापीठ प्रक्षेत्रातील आंबा आणि काजू बागेला पाणी देऊन हमखास व अधिक उत्पादन घेतले आहे. आंबा, काजू बागेला पाणी दिल्यास उत्पादन वाढू शकते हे प्रयोगांती सिद्ध झाले आहे.
गुणवत्ता वाढीसाठी शेततळ्याचा डोस
By admin | Published: June 10, 2015 11:20 PM