वेंगुर्ला : वेतोरे मिरमेवाडी येथील शेतकरी नितीन मधुकर गावडे यांच्यावर गव्याने केलेल्या हल्ल्यात ते जखमी झाले. मात्र, तेथील ग्रामस्थांनी वेळीच दाखविलेल्या प्रसंगावधानाने ते थोडक्यात बचावले.वेतोरे येथील नितीन गावडे हे ढवाळसे येथील शेतमांगरातून गुरुवारी सकाळी ७.३० वाजता दुचाकीने गाई-म्हशींचे दूध घेऊन दूध डेअरीवर जात असताना वेतोरे तिठ्यानजीक कृष्णा चिचकर यांच्या घरासमोर गव्याने त्यांच्यावर अचानक हल्ला केला. तेथील ग्रामस्थांनी आरडाओरड केल्याने गावडे किरकोळ जखमी होत थोडक्यात बचावले.
यावेळी आबा साळगावकर, भगवान म्हापणकर, वैभव धुरी, कृष्णा चिचकर, प्रकाश अणसूरकर, गजानन धुरी, तुषार चिचकर, गुरुनाथ वराडकर यांनी धाव घेत गावडे यांची सुटका करीत कुडाळ येथील रुग्णालयात दाखल केले.कुडाळ येथील खासगी रुग्णालयात उपचार करून त्यांना घरी पाठविण्यात आले. गावडे यांच्या डोक्याला सहा टाके पडले असून किरकोळ दुखापत झाली आहे. तर दुचाकीचे सुमारे दहा हजार रुपयांचे नुकसान झाले आहे.
वेतोरे पंचक्रोशीत गवे, बिबटे यांची कायमची दहशत असून भरदिवसा वन्य प्राणी स्थानिक ग्रामस्थांवर हल्ला करीत आहेत. त्यामुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. वनविभागाने या वन्यप्राण्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी वेतोरेवासीयांमधून होत आहे.