सावंतवाडी : कोकणात सेंद्रीय पद्धतीने तयार केलेल्या नारळांच्या उत्पादनाला मुंबईत मोठ्या प्रमाणात मागणी आहे. मात्र, शेतकऱ्यांना मार्केटींग करता येत नसल्याने नारळाच्या मालाला हमीभाव मिळत नाही. यामुळे शेतकऱ्यांनी दबावगट निर्माण करायला हवा, असे प्रतिपादन कोकण कृषीभूमी प्रतिष्ठानचे अध्यक्ष बाळासाहेब परू ळेकर यांनी केले. सावंतवाडी तालुक्यातील नारळ बागायतदार शेतकऱ्यांसाठी कार्यशाळेचे आयोजन केले होते. यावेळी परूळेकर बोलत होेते. याप्रसंगी माजी आमदार तथा ज्येष्ठ शेतकरी पुष्पसेन सावंत, सुरेश गवस, ठाणे कृषीतंत्र अधिकारी शरद आगलावे, रामानंद शिरोडकर, टी. देविदास, रमाकांत मल्हार, शंकर कलमाणी, पांडुरंग तोंडकर उपस्थित होते. यापुढे परूळेकर म्हणाले की, रासायनिक खतांचा वापर वाढल्याने निसर्गावर मानवाची कुरघोडी सुरू झाली आहे. या दहा वर्षात जमिनीचा टिकाऊपणा व पर्यावरणाचा समतोल बिघडला आहे. नारळ उत्पादनामध्ये केरळ व कोकण आघाडीवर आहेत. पण शेतकऱ्यांना मार्केटींग जमत नाही. परिणामी कोकणातील शेतकरी उत्पादन घेऊनही आर्थिक टंचाईला सामोरे जावे लागत आहे. यामुळे एकत्र येऊन शेतकऱ्यांनी प्रयत्न करणे गरजेचे आहे. यासाठी प्रगतीशील शेतकरी यांच्या बागायतीमध्ये भेट घेऊन इतर शेतकऱ्यांनी अभ्यास करावा. सेंद्रीय पद्धतीने नारळ व नैसर्गिक वस्तूंचे उत्पादन घेतल्यास मुंबई मार्केटमध्ये त्याची मागणी आहे. यामुळे शेतकऱ्यांनी उत्पादन आणि उत्पन्न याची योग्य सांगड घालून काम केल्यास योग्य तो भाव मिळेल व शेतकऱ्यांच्या मुलांनाही नोकरी करण्याची गरज उरणार नाही. शेतकरी हा शास्त्रज्ञ आहे. तर शेती ही प्रयोगशाळा आहे. गोमूत्र ते फिनॅल त्याने तयार करण्याचे तंत्र विकसित केले आहे. यामुळे शेतकऱ्यांमध्ये किती ताकद आहे, हे यावरून दिसून येते. यामुळे शेतकऱ्यांनी संघटीत होऊन दबावगट निर्माण करा, असे आवाहन परूळेक र यांनी केले.पुष्पसेन सावंत म्हणाले, नुसते लोकप्रतिनिधींवर अवलंबून राहू नका. तर शेतकऱ्यांनी संघटीत होऊन आपल्या प्रश्नांबाबत प्रशासनाशी भांडणे गरजेचे आहे. ४० वर्षांच्या कालावधीत शेतकरी व बागायतदार कधीही एक झाले नाही. नवीन पिढी पॉवर ट्रिलरने शेती करतात. त्यामुळे जमीन टिकून राहत नाही. नांगराने नांगरलेलीे जमीन सुपीक होते. यामुळे नवीन पिढीने पारंपरिक शेतीही विकसित करणे आवश्यक आहे. शंकर कलमाणी यांनी नारळाच्या उत्पन्नावरच अवलंबून न राहता नारळाच्या वस्तूंवर प्रक्रिया करून छोटेमोठे उद्योग सुरू करणे आवश्यक असल्याचे सांगितले. (वार्ताहर)
शेतकऱ्यांनी दबावगट निर्माण करण्याची आवश्यकता
By admin | Published: November 15, 2015 11:07 PM