सिंधुदुर्गनगरी : मागील तीन महिन्यांचे थकित वेतन मिळावे आणि शासनाने जाहीर केल्याप्रमाणे वाढीव मानधनासह मानधन फरकाची रक्कम मिळावी यासाठी महाराष्ट्र राज्य कास्ट्राईब कर्मचारी कल्याण महासंघाच्या नेतृत्वाखाली अंशकालीन स्त्री परिचर कर्मचाऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण छेडले. तसेच या उपोषणाची दखल प्रशासनाने न घेतल्यास आगामी अधिवेशन काळात आझाद मैदानावर बेमुदत उपोषण करण्यात येणार असल्याचा इशाराही यावेळी देण्यात आला आहे.महाराष्ट्र राज्य कास्ट्राईब कर्मचारी कल्याण महासंघाचे अतिरिक्त महासचिव रावजी यादव यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यातील अंशकालीन स्त्री परिचर कर्मचाऱ्यांनी सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण छेडले. यावेळी उषा लाड, शितल सावंत, सुचित्रा मुणगेकर, पूजा जाधव आदी अंशकालीन स्त्री परिचर उपस्थित होते.यावेळी जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, अंशकालीन स्त्री परिचर कर्मचाऱ्यांना प्रति दिन ४० रुपये एवढे अत्यंत तुटपुंजे मानधन दिले जाते तसेच तेही वेळेत दिले जात नाही. फेब्रुवारी ते एप्रिल २०१९ या तीन महिन्यांचे मानधन या कर्मचाऱ्यांना मिळालेले नाही, ते मिळावे.
शासनाने जानेवारी २०१९ पासून १०० रुपये मानधन देण्याचा निर्णय घेतला. त्याची अंमलबजावणी जिल्हा परिषदेने करावी, वाढीव मानधन फरकाची रक्कम देण्यात यावी, स्त्री परिचरांना शासकीय सेवेत आरक्षण मिळावे, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी यांनी सेवानिवृत्तांचे गट विमा प्रस्ताव मंजूर करावेत यांसह अन्य मागण्या मान्य कराव्यात यासाठी अंशकालीन स्त्री परिचर कर्मचाऱ्यांनी सोमवारी हे लाक्षणिक उपोषण छेडले.मानधन काढायला माणूसच नाही : यादवजिल्ह्यात एकूण २४० अंशकालीन स्त्री परिचर कर्मचारी आहेत. त्यांचे मानधन वेळेत होत नाही.याबाबत आरोग्य विभागाशी चर्चा केली असता त्यांच्याकडे या कर्मचाऱ्यांचे मानधन काढण्यासाठी माणूस नसल्याचे कारण पुढे केले जात आहे.आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांचे पगार काढण्यासाठी माणूस मिळतो. मात्र स्त्री परिचर कर्मचाऱ्यांच्या मानधनासाठी आरोग्य विभागाला माणूस का मिळत नाही? अशा शब्दांत रावजी यादव नाराजी व्यक्त केली. तसेच हे एकदिवसीय आंदोलन छेडले असून त्यानंतरही दखल घेतली गेली नाही तर पावसाळी अधिवेशनात आझाद मैदानावर बेमुदत उपोषण करणार असल्याचा इशाराही यादव यांनी दिला.