सावंतवाडी : इन्सुली-डोबवाडी येथील डांबर प्लांटमुळे स्थानिक ग्रामस्थांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. याबाबत वेळोवेळी तक्रार करूनही संबंधित यंत्रणा दखल घेत नसल्याने शनिवारी ग्रामस्थांनी तहसीलदार कार्यालयासमोर उपोषण केले. संबंधित प्लांट मालक व ग्रामस्थांची ९ डिसेंबर रोजी संयुक्त बैठक घेण्यात येईल.तसेच निर्णय होईपर्यंत प्लांट बंद ठेवण्याचे आश्वासन दिल्यानंतर हे उपोषण तात्पुरते स्थगित करण्यात आले.इन्सुली-डोबाचीशेळ येथे गेल्या कित्येक वर्षांपासून डांबर प्लांट सुरू आहे. या प्लांटमुळे होणारे प्रदूषण आरोग्यास हानिकारक असल्याची तक्रार स्थानिक ग्रामस्थांनी वेळोवेळी महसूलच्या प्रशासनाकडे केली होती. मात्र, कोणतीच दखल घेण्यात येत नसल्याने उपोषणास बसण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला होता.
या पार्श्वभूमीवर शुक्रवारी ग्रामस्थांनी माजी राज्यमंत्री व आमदार दीपक केसरकर यांची भेट घेऊन उपोषणाला बसण्याबाबत निवेदन दिले होते. यावेळी ग्रामस्थांच्या आरोग्याच्या सवाल निर्माण होत असल्यास कारवाई करण्याबाबत पाठपुरावा केला जाईल तसेच याबाबत उपाययोजना म्हणून संयुक्त बैठक घेण्यात येईल, असे आश्वासन केसरकर यांनी दिले होते. मात्र, ठरल्याप्रमाणे शनिवारी ग्रामस्थांनी येथील तहसील कार्यालयासमोर उपोषण सुरू केले. यावेळी माजी पंचायत समिती सदस्य नारायण राणे, सरपंच पूजा पेडणेकर, उपसरपंच सदा राणे, कृष्णा सावंत, स्वागत नाटेकर यांसह बहुसंख्य ग्रामस्थ उपस्थित होते.सनदशीर तोडगा न निघाल्यास उपोषणतहसीलदार राजाराम म्हात्रे यांनी उपोषणाला भेट देऊन ग्रामस्थांशी चर्चा केली. यामध्ये संबंधित प्लांट मालकाशी चर्चा करून ग्रामस्थ आणि प्लांट मालक यांची संयुक्त बैठक ९ डिसेंबर रोजी घेण्यात येईल. तसेच निर्णय होईपर्यंत प्लांट बंद ठेवण्याचे आश्वासन म्हात्रे यांनी दिल्यानंतर उपोषण स्थगित करण्यात आले. दरम्यान, याबाबत सनदशीर तोडगा न निघाल्यास पुन्हा आमरण उपोषण करण्याचा इशारा यावेळी उपस्थित ग्रामस्थांनी दिला.