कणकवली: कणकवली बांधकरवाडी येथील चेतन दिलीप पवार व त्याच्यासोबत असलेला सुनील चव्हाण यांच्यावर रविवारी रात्री शासकीय ठेकेदारीच्या वादातून जीवघेणा हल्ला झाला आहे. हा हल्ला केल्याप्रकरणी पवार याच्या तक्रारीवरून संशयित आरोपीं विरोधात कणकवली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.चेतन पवार हा आपल्या जेसीबी ऑपरेटर सुनील चव्हाण याच्यासह कणकवली बांधकरवाडी जवळ दत्तकृपा निवारा शेड मध्ये रविवारी रात्री ८ वाजण्याच्या सुमारास बसला होता. यावेळी तिथे तीन कारमधून ८ ते १० लोक आले होते. चेतन पवार याने डिसेंबर २०२३ मध्ये देवगड येथील शासकीय कामाचा ठेका भरला होता. त्या ठिकाणी पवार आणि संशयित आरोपी यांच्यात कामाच्या ठेक्यावरुन वाद झाला होता. त्यावेळचा राग मनात ठेवून आरोपी यांनी रविवारी 'तू देवगड मध्ये येऊन टेंडर का भरतोस ?' अशी विचारणा पवार याला केली. तसेच शिवीगाळ करीत आरोपीनी स्कॉर्पिओ गाडीतून आणलेल्या लाकडी दांडक्यांनी व दगडाने मारहाण करीत पवार व त्याचा साथीदार यांना गंभीर दुखापत केली. ओळख पटू नये म्हणून तोंडाला रुमाल बांधले संशयित आरोपींनी ओळख पटू नये यासाठी आपल्या तोंडाला रुमाल बांधले होते. याप्रकरणी चेतन पवार याने पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून कणकवली पोलिसानी संशयितांवर विविध कलमानुसार गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणाचा अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक सागर शिंदे करीत आहेत.
ठेकेदारीच्या वादातून कणकवलीत दोघांवर जीवघेणा हल्ला!, तीन कारमधून आलेल्या टोळक्याने दांड्याने केली मारहाण
By सुधीर राणे | Published: March 11, 2024 3:02 PM