अनंत जाधवसावंतवाडी : कोरोनामुळे गेले नऊ महिने ठप्प असलेले व्यवहार आता कुठे सुरळीत होत असताना पुन्हा एकदा कोरोनाची दुसरी लाट येणार असल्याच्या भीतीने सिंधुदुर्गातीलपर्यटन स्थळे पुन्हा सुनी सुनी होऊ लागली आहेत. गोव्याकडे जाणाऱ्या पर्यटकांच्याही संख्येत मोठी घट झाली आहे. हॉटेल, लॉजिंगकडेही पर्यटकांनी पाठ फिरविली आहे. त्यातच महाराष्ट्र शासन सर्व सीमांवर कोरोना चाचणी करणार असल्याच्या अफवेने गोव्याच्या पर्यटनावरही मोठा परिणाम झाला आहे.कोरोनाच्या पहिल्या लाटेत नऊ महिने पर्यटन हंगाम वाया गेला असतानाच आता कुठेतरी बाजारात तसेच पर्यटन स्थळांवर गर्दी होऊ लागल्याचे दिसत होते. तोच कोरोनाची दुसरी लाट येत असल्याने तिचे परिणाम आता ठळकपणे जाणवू लागले आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सीमा तपासणी नाक्यावर तपासणी करण्यात येत असल्याने पर्यटकांची संख्या रोडावली असल्याचे चित्र आहे.सिंधुदुर्गात गेल्या काही वर्षांत पर्यटकांची ओघ वाढला होता. मात्र, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेल्या नऊ महिन्यांपासून सिंधुदुर्गात पर्यटकांची हजेरी लागली नव्हती. पण संचारबंदी शिथिल झाल्यानंतर लोक पर्यटनासाठी जिल्ह्यात येऊ लागले होते.या दरम्यान महाराष्ट्र राज्याने गोवा, गुजरात राज्यातून रेल्वेने, विमानातून येणाऱ्या प्रवाशांची तपासणी तसेच महामार्गावरून जाणाऱ्या प्रवाशांची तपासणी करण्याचा निर्णय घेतला. या पार्श्वभूमीवर तपासणी करण्यात येणार आणि पॉझिटिव्ह आढळल्यास क्वारंटाईन करण्यात येणार या भीतीने पर्यटकांनी सिंधुदुर्गकडे पाठ फिरविली असल्याचे चित्र आहे.सावंतवाडी येथील प्रसिद्ध भालेकर खानावळीचे मालक राजू भालेकर यांनी पर्यटकांची संख्या रोडावली असल्याचे सांगितले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कोविड चाचणी अहवालाबाबत अफवा पसरवली गेली आहे. त्यामुळे पर्यटकांची संख्या घटत आहे असे ते म्हणाले.आता पुढील काळात नाताळ सण येत असल्याने पर्यटक मोठ्या प्रमाणात येणार आहेत. परंतु कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आरोग्य तपासणी केली जाणार आणि बाधित आढळल्यास क्वारंटाईन करण्यात येणार असे चित्र पर्यटकांसमोर उभे राहिले तर पर्यटक येण्याची शक्यता कमी झाली आहे.कोरोना काळातील गेल्या नऊ महिन्यांपासून पर्यटन उद्योग आणि पर्यटन उद्योगाशी संबंधित व्यवसाय आर्थिक अडचणीत सापडले असताना दिवाळीच्या दरम्यान पर्यटन व्यवसायाशी संबंधित रोजगार सुरू झाल्याने आर्थिक अडचण दूर होण्याची शक्यता होती. मात्र, आता पुन्हा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर तपासणी करण्यास सुरुवात केल्याने पर्यटकांची संख्या रोडावली असल्याचे चित्र आहे.कोरोना चाचणीच्या अफवेमुळे परिणामगोव्याकडे जाणाऱ्या पर्यटकांंची कोरोना चाचणी करण्यात येणार अशी अफवा सर्वत्र पसरविण्यात आली होती. त्याचा परिणाम पर्यटनावर जाणवत असून, पर्यटक येण्यास बघत नाहीत. हॉटेल व्यवसायावर याचा सर्वात जास्त परिणाम झाल्याचे सावंतवाडीतील हॉटेल व्यवसायिक राजू भालेकर यांनी सांगितले. याचा कुठे तरी शासनस्तरावर खुलासा होणे गरजेचे होते, असेही त्यांनी सांगितले.
कोरोना लाटेच्या भीतीने पर्यटक घटले, हॉटेल व्यवसायाला फटका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 03, 2020 4:53 PM
Coronavirus, tourisam, goa, sawantwadi, sindhudurgnews कोरोनामुळे गेले नऊ महिने ठप्प असलेले व्यवहार आता कुठे सुरळीत होत असताना पुन्हा एकदा कोरोनाची दुसरी लाट येणार असल्याच्या भीतीने सिंधुदुर्गातील पर्यटन स्थळे पुन्हा सुनी सुनी होऊ लागली आहेत.
ठळक मुद्देकोरोना लाटेच्या भीतीने पर्यटक घटले, हॉटेल व्यवसायाला फटका गोव्याकडे जाणाऱ्या गाड्याही झाल्या कमी