बाळकृष्ण सातार्डेकर
रेडी : गेले चार दिवस रेडी परिसरात सायंकाळच्या वेळी गडगडाटासह पडत असलेल्या पावसामुळे येथील भातशेती कुजून वाया जाण्याची भीती शेतकरीवर्गातून व्यक्त केली जात आहे. असाच आणखी काही दिवस पाऊस पडल्यास हातातोंडाशी आलेले पीक जमीनदोस्त होण्याची शक्यता आहे. भातपीक कापणीयोग्य झाले असतानाच जोरदार पावसाने हजेरी लावल्याने शेतकरी धास्तावला आहे.
कोकण परिसरात जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून सक्रिय झालेल्या पावसामुळे शेतकºयांना चांगला दिलासा मिळाला होता. मे महिन्याच्या अखेरीस जमिनीची भाजणी, मशागत, नांगरणी करून तरवा काढणीची कामे व्यवस्थित पार पडली होती. अशातच हजेरी लावलेल्या पावसामुळे पेरणी, लावणी आदी कामे वेळेत पार पडली होती.
भातशेती हे कोकणातील पारंपरिक मुख्य पीक आहे. पण येथील शेती ही पावसाच्या लहरीपणावरच अवलंबून असते. यावर्षी मात्र जूनच्या पहिल्या आठवड्यापासूनच पावसाने हजेरी लावल्याने शेतकरी समाधानी होता. रेडी गाव गेल्या ५० वर्षांपासून मायनिंग व्यवसायामुळे तसेच पर्यटनदृष्ट्या जागतिक नकाशावर आला आहे. येथील शेतकरी प्रामुख्याने मळे शेतीला प्राधान्य देतात. काही प्रमाणात भरडी शेतीही केली जाते. जास्त वेतन देऊनही मजूरवर्ग मिळत नसल्याने घरातील सर्व मंडळींच्या सहभागातून शेतीची कामे केली जातात.भातपिकावर परतीच्या पावसाचे सावटसद्यस्थितीत रेडीसह शिरोडा, आरवली, टांक, आसोली, आजगाव, आरोंदा, तळवणे परिसरात भातपीक कापणीयोग्य झाले आहे. पण गेल्या काही दिवसांपासून सायंकाळच्यावेळी विजांच्या कडकडाटासह आणि ढगांच्या गडगडाटासह पडणाºया पावसामुळे भातपीक धोक्यात आले आहे. पावसाचा जोर असाच राहिल्यास शेतीचे नुकसान होण्याच्या भीतीने शेतकरी चिंताग्रस्त आहेत.
कोकणातील शेती निसर्गाच्या लहरीपणावर अवलंबून आहे. अवेळी पडणारा पाऊस, कामगारांची मजुरी, शेतीचे साहित्य, महागडी खते यांचा ताळमेळ घालून शेती करताना शेतकºयाची दमछाक होते. अनेक संकटांचा सामना करून केलेल्या शेतीवर परतीच्या पावसाचे संकट आले आहे. पावसाचा जोर कायम राहिल्यास शेतीची जमीनदोस्त होण्याची शक्यता आहे.- किशोर वारखंडकर,शेतकरी, रेडी-म्हारतळेवाडी