सिद्धेश आचरेकर --मालवण --महाराष्ट्रातील किनारपट्टीवरील जलधी क्षेत्रात गेली पाच वर्षे अनेक संघर्ष घडले आहेत. पारंपरिक मासेमारी व आधुनिक मासेमारी अशी या वादाची किनार नेहमीच अनुभवता आली. गतवर्षी महाराष्ट्र शासनाने पारंपरिकांना दिलासा देताना पर्ससीन मासेमारीवर निर्बंध घातले. त्यानंतर झालेल्या हायस्पीड संघर्षात परराज्यातील नौकांना तब्बल ४२ लाखांचा दंड झाल्याने सिंधुदुर्ग किनारपट्टीवर मत्स्य हंगामाच्या शेवटच्या काळात मुबलक मासळी पारंपरिक मच्छिमारांच्या जाळ्यात मिळाली. मासेमारीच्या आश्वासक श्रीगणेशानंतर विविध संघर्षाने व्यापलेली ही किनारपट्टी मत्स्य हंगामाच्या शेवटच्या टप्प्यात शाश्वत राहिली. आता सन २०१६-१७ च्या मत्स्य हंगामाला १ आॅगस्टपासून सुरुवात होणार आहे. त्याआधी गिलनेट (न्हय) पद्धतीची मासेमारी करणाऱ्या मच्छिमारांनी ‘प्रकाशझोता’तील मासेमारी सिंधुदुर्ग किनारपट्टीवर पाय रोवत असल्याने नव्या हंगामाच्या सुरुवातीपासून संघर्ष होण्याची चिन्हे आहेत.गोवा राज्यात अशा पद्धतीची मासेमारी सुरु असल्याने तेथील स्थानिक मच्छिमारांच्या रोजीरोटीवर गदा आली होती. त्यांनतर गोव्यातील सर्व मच्छिमार एकत्र येवून या मासेमारी विरोधात तीव्र आंदोलन छेडले होते. गोव्यातील मासेमारी तसेच मच्छिमार्केट बंद ठेवून निषेधही व्यक्त करण्यात आला होता. यात झालेल्या संघर्षामुळे गोव्याच्या अर्थकारणावरही मोठा परिणाम झाला होता. येथील सर्व मच्छिमार एकवटल्यामुळे १३ मेपासून प्रकाशझोतातील मासेमारी करणाऱ्या नौकांची हकालपट्टी केल्यानंतर त्यांनी मेच्या अखेरीस त्या नौकांनी आपला मोर्चा सिंधुदुर्ग किनारपट्टीवर वळविला होता. सध्या मासेमारी बंद कालावधी तसेच समुद्र खवळलेला असल्यामुळे मासेमारी बंद आहे. मात्र १ आॅगस्टपासून मत्स्य हंगाम सुरु होत असल्याने या प्रकाशझोतातील मासेमारीचे नवे संकट उभे ठाकले आहे. गोव्यात एलईडी दिव्यांनी मासेमारी करण्यास घालण्यात आलेली बंदी रविवार १७ जुलै रोजी उठणार असून पुन्हा एकदा गोव्यातही संघर्ष होण्याची शक्यता आहे.काय असते ही प्रकाशझोत मासेमारीसाधारण समुद्रात २० वावाच्या बाहेर मासेमारी करत असताना सुरुवातीला प्रखर लाईट असलेला एक साधा व एक पर्ससीन ट्रॉलर वापरला जातो. यात साध्या ट्रॉलरवर मोठा जनरेटर सेट बसविण्यात येतो. संपूर्ण ट्रॉलरवर प्रखर दिव्यांची रोषणाई केली जाते. या रोषणाईच्या आकर्षणाने बांगडा, वाम, म्हाकुल, सुरमई, पापलेट तसेच इतरही प्रचंड मागणी असणाऱ्या मासळीचे थवेच्या थवे लाईटच्या दिशेने ओढले जातात. अर्धा ते पाऊण तास प्रखर लाईट सुरू ठेवल्यानंतर सुमारे वीस किलोमीटर परिसरातील मासळी त्या ट्रॉलरच्या परिघात सामावली जाते. नंतर लाईट बंद केली जाते आणि त्याचवेळी ट्रॉलरजवळ आकर्षित झालेली मासळी पर्ससीन जाळ्यांच्या सहाय्याने ट्रॉलरमधून पकडली जाते. या मासेमारीमुळे लहान-लहान मासळीही तसेच मत्स्यबीज नष्ट होत आहे. याप्रकारची मासेमारी करण्यासाठी सिंधुदुर्गात गोवा, कर्नाटकातील काही हायस्पीड पर्ससीन दाखल होण्याची भीती स्थानिक गिलनेटधारक, ट्रॉलरधारक मासेमारी करणाऱ्यांना सतावत आहेत. सिंधुदुर्गची किनारपट्टी अवघी १२० किलोमीटरची आहे. त्यामुळे एकाचवेळी सहा जनरेटर ट्रॉलर उभे राहिले, तर संपूर्ण किनारपट्टीवरील मत्स्यबीज कॅच करण्याची क्षमता त्यांच्यात आहे.अनधिकृत मासेमारी, परराज्यातील हायस्पीड मासेमारी ही आव्हाने झेलणाऱ्या मच्छिमारांना आचरा संघर्षालाही सामोरे जावे लागले. त्यात पारंपरिक मच्छिमारांच्या दृष्टीने पर्ससीन मासेमारीवर निर्बंध घालताना नव्या परवान्यांना बंदी घालण्याचा दिलासादायक निर्णय राज्य शासनाने दिला. असे असले तरी मत्स्य दुष्काळाच्या झळा मत्स्य हंगामाच्या अखेरीपर्यंत कायम राहिल्या. आता शासनाने फेब्रुवारी महिन्यात घातलेली पर्ससीन मासेमारीवरील बंदी उठली आहे. मात्र पर्ससीनधारकांना घालण्यात आलेल्या दहा अटी-शर्थी बंधनकारक राहणार आहेत. महाराष्ट्र राज्याच्या ० ते १२ नॉटीकल मैल हे क्षेत्र स्थानिक मच्छिमारांसाठी राखीव आहे. त्यामुळे बंधने झुगारून पर्ससीन मासेमारी झाल्यास संघर्ष होणे नाकारता येणार नाही. परराज्यातील नौकांची होणारी जलधी क्षेत्रात घुसखोरी रोखण्यासाठी पारंपारिक मच्छिमारांना २५ नॉटीकल मैलपर्यंत जलधी क्षेत्र राखीव ठेवण्यात यावे, अशी मागणी होत आहे. यावर्षी शासनाला पर्ससीन मासेमारीची घुसखोरी रोखणे आव्हान असणार आहे. प्रखर लाईट मासेमारी धोक्याची घंटा; शासनाला साकडे घालणारगतवर्षी १ आॅगस्टपासून मासेमारीला सुरुवात झाली. सुरुवातीला मोरी, सुरमई, पापलेट या बड्या मासळीसह पारंपरिक मच्छिमारांच्या जाळ्यात तारलीही मिळाली. मात्र मत्स्य हंगामाच्या आश्वासक सुरुवातीनंतर मत्स्य उत्पादन घटले. आता यावर्षीच्या मत्स्य हंगामाच्या सुरुवातीला या नव्या मासेमारीचे संकट सिंधुदुर्ग किनारपट्टीवर उभे ठाकले आहे. मत्स्योत्पादन घटण्यास आधुनिक मासेमारी धोक्याची मानली जाते. मासळीची बेसुमार लयलूट झाल्याने गतवर्षी शेवटच्या टप्प्यात मच्छिमारांना मत्स्य दुष्काळाला सामोरे जावे लागले होते. आता किनारपट्टीवर प्रखर लाईट मासेमारी दुर्दैवाने सुरु राहिल्यास ही मासेमारी नव्या संघर्षाच्या शमलेल्या नव्या वादाला तोंड फोडणारी आहे. याबाबत गिलनेटधारक मच्छिमार शासनाचे लक्ष वेधणार असून ही मासेमारी सिंधुदुर्ग किनारपट्टीवर होऊ नये यासाठी साकडे घालणार आहेत.गतवर्षी आम्ही मच्छिमारांनी एकीचे दर्शन दाखवत समुद्रात हायस्पीड नौका बेसुमार मासळीची करत असलेली लयलूट चित्तथरारकरित्या थांबवून जे शासनाला शक्य नाही ते मच्छिमारांनी साध्या बोटीने करून दाखविले. यातून शासनाच्या तिजोरीत तब्बल ४२ लाखाचा दंड एका क्षणात जमा झाला. मात्र त्यानंतर शासन उदासीनच राहिले. परराज्यातील बोटींचा ‘सैतानी’ धुमाकूळ सिंधुदुर्गात सुरु असतो. यात शासनकर्ते सुशेगाद आहेत. मासेमारी करण्यासाठी नवनव्या क्लुप्त्या, तंत्रज्ञान आदी विकसित करण्यात आले खरे मात्र हे आम्हा पारंपारिक तसेच स्थानिक मच्छिमारांना देशोधडीला लावणारे आहे. जिल्ह्यातील शिल्लक असलेल्या मत्स्यसाठ्याची लयलूट थांबली नाही तर उपासमारीची वेळ येईल. प्रखर लाईटच्या आधारे करण्यात येणारी मासेमारी स्थानिक मच्छिमारांना नामशेष करणारी आहे. गोव्या प्रमाणे येथील मच्छिमारांनी याविरोधात एकत्र येवून आवाज उठविला पाहिजे. तरच भविष्यात सुखाचे दोन घास खाता येतील. - गोपिनाथ तांडेल, मच्छीमार नेतेमत्स्यसाठे नष्ट होण्याची भीतीसिंधुदुर्गात होणारा प्रकाशझोतातील मासेमारीचा उदय म्हणजे मत्स्यसाठाच नष्ट होण्याची चिन्हे आहेत. गेल्या काही वर्षात सुरु असलेली मासळीची लयलूट पाहता मत्स्य बीज कमी प्रमाणात मिळत असल्याने मत्स्य उत्पादनात मोठी घट जाणवत आहे. प्रकाशझोतातील मासेमारीचा धुमाकूळ सुरु राहिल्यास खोल समुद्रात असलेले मासळीची थवे नष्ट होऊन अवघ्या दोन वर्षात मत्स्यदुष्काळ येण्याची स्थिती निर्माण होऊ शकते. तसेच किनारपट्टी भागात धुडगूस सुरु राहल्यास येथील पारंपरिक तसेच गिलनेट धारक मच्छिमारांवर उपासमारीची वेळ नक्कीच येवू शकते. प्रखर लाईटच्या आधारे मासळीचे थवेच्या थवे ट्रॉलरवाले गायब करत आहेत.
‘प्रकाशझोता’तील मासेमारीने संघर्ष पेटणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 16, 2016 10:56 PM