बांदा : पाडलोस येथे गव्यांचा उपद्रव सुरू असून सोमवारी सायंकाळी ७ वाजण्याच्या सुमारास गवा चक्क अंगणात आला. जवळच बसलेल्या शेतकऱ्यांचा गव्याने पाठलाग केला. मात्र त्याने घरात पळ काढल्याने व दैव बलवत्तर म्हणून त्याचे प्राण वाचले. अशा घटना मडुरा परिसरात वारंवार होत असून वनविभागाकडून कोणतेही पाऊल उचलेलेले दिसून येत नाही. ग्रामस्थांच्या जिवास कोणतीही हानी झाल्यास गप्प बसणार नसून दोन दिवसांत सावंतवाडी वनविभागावर मोर्चा नेणार, असा इशारा शेतकऱ्यांनी दिला.शेतकरी हर्षद उदय परब यांना घराशेजारी असलेल्या वायंगणी शेतीत गवे आल्याची चाहूल लागली. त्यांनी अंगणातूनच शेतात बॅटरीचा प्रकाश टाकला असता दोनपेक्षा अधिक गवे निदर्शनास आले
. कष्ट करून फुलवलेली शेती समोरच उद्ध्वस्त होईल या भितीने शेतकरी हर्षद परब यांनी त्या गव्यांना बॅटरीच्या सहाय्याने हाकलण्याचा प्रयत्न केला. परंतु त्यातील एका गव्याने चक्क त्यांचा घरापर्यंत पाठलाग केला. त्या दरम्यान परब यांच्या कुत्र्यांनी आक्रमकता दाखविल्याने गव्याने मार्ग बदलल्यामुळे त्यांचे प्राण वाचले. हा थरारक प्रसंग सांगताना परब खूप घाबरलेले होते.पाडलोस केणीवाडा येथे पहिल्यांदा सुनील नाईक यांच्यावर हल्ला केला. त्यानंतर बाळा परब यांच्या बागेतील कामगार, आरोस जत्रोत्सवातून परतणाऱ्या दोन शेतकऱ्यावर चक्क दोन फूट अंतरावरून हुलकावणी दिली. तर दोन दिवसांपूर्वी एका बिबट्याचे वस्तीपासून हाकेच्या अंतरावर पावलांचे ठसे मिळाले. आता तर अंगणापर्यंत गवे आल्याने ग्रामस्थांत भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.पाडलोस तसेच विलवडे गावातही गव्यांचा मुक्त संचार सुरू आहे. विलवडे हा शेतीनिष्ठ गांव म्हणून ओळखला जातो. पण शेतकऱ्यांच्या अनेक समस्या आहेत. सरकार याकडे लक्ष देईल का? अशी शेतकऱ्यांची खंत आहे. विलवडे (टेंबवाडी) गावातील शेतकरी अर्पणा दळवी यांच्या घरासमोर एक गवा दिसल्याने भीतीचे वातावरण निर्माण झालेले आहे.
दोन महिन्यांपूर्वी दळवी यांच्या घराशेजारी असलेले नाचणीचे शेत गव्यांनी एका रात्रीत फस्त केले होते. वनविभागाने फक्त पंचनामा केला. पण एकही रुपया न मिळाल्याचे दळवी यांनी सांगितले. आम्हांला तुमचा कागदोपत्री पंचनामा नको तर सरकारने गव्यांचा कायमस्वरुपी बंदोबस्त करावा, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.