कणकवली : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना चौकशीसाठी पोलीस ठाण्यात हजर राहण्यासाठी कणकवली पोलिसांनी नोटीस बजावली होती. या नोटीसीला मंत्री राणेंनी पत्राद्वारे काल, बुधवारी उत्तर दिले होते. असे असतानाच आज कणकवली पोलिसांनी मंत्री राणे यांची त्यांच्या ओम गणेश या निवासस्थानी जाऊन भेट घेतली.कणकवली पोलिसांनी दुपारी एक ते दिड तासापूर्वी मंत्री राणे यांची त्यांच्या ओम गणेश या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. तब्बल पंधरा ते वीस मिनिटे पोलीस आणि राणे यांच्यात चर्चा सुरू होती. मात्र या चर्चेचा तपशील समजू शकला नाही. पोलिसांनीही या चर्चेबाबत बोलण्यास नकार दिला. मंत्री राणें यांच्या भेटीत वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याचे पथक होते. यात नेमकी आमदार नितेश राणे याच्याबाबत माहिती घेतली असावी असा अंदाज आहे. किंवा कालच्या पोलीस नोटीसी बाबत जबाब नोंदवला असावा अशी शक्यता आहे. कारण कालच राणें यांनी आपण पुढील दोन, तीन दिवस कामात व्यस्त आहे. त्यामुळे तशी आवश्यकता असल्यास व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे बजावलेल्या नोटीसीबाबत मी जबाब नोंदवण्याचा तयार आहे अशा आशयाचे पत्र कणकवली पोलीस ठाण्यात दिले होते.मंत्री राणे हे काल, बुधवार रात्री पासूनच कणकवली येथील बंगल्यात आहेत. त्यांनी आज दिवसभर जिल्हा बॅंक निवडणुकीसंदर्भात स्थानिक पदाधिकारी कार्यकर्त्यांकडून माहिती घेतली तसेच गाठीभेटी घेतल्या. आज सकाळपासून जिल्हा बँक निवडणुकीसाठी मतदान प्रक्रिया सुरु आहे. कणकवली मतदान केंद्रावर झालेली बाजाबाजी वगळता मतदान सुरळीत पार पडत आहे.
केंद्रीय मंत्री नारायण राणेंशी कणकवली पोलिसांची पंधरा ते वीस मिनिटे चर्चा, निवासस्थानी जाऊन घेतली भेट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 30, 2021 4:41 PM