सावंतवाडी : अखंड महाराष्ट्राच्या नावावर कोकण व विदर्भाचे शोषण सुरू आहे. या दोन्ही प्रदेशांसाठी वेगळे निकष असणे आवश्यक असल्याचा तज्ज्ञ समितीचा अहवाल असतानाही शासनाने तो मान्य केला नाही. त्यामुळे भविष्यात वेगळ्या कोकण राज्याच्या मागणीचा लढा तीव्र केला जाणार असल्याचे स्वतंत्र कोकण राज्यनिर्मिती संघटनेचे अध्यक्ष प्रा. महेंद्र नाटेकर यांनी केले. येथील श्री पंचम खेमराज महाविद्यालयात ‘स्वतंत्र कोकण : काळाची हाक’ निबंध स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळा आयोजित करण्यात आला होता. यावेळी प्रा. नाटेकर बोलत होते. यावेळी व्यासपीठावर राजमाता सत्त्वशिलादेवी भोसले, प्रा. डी. एल. भारमल, राम मेस्त्री, आदी उपस्थित होते. प्रा. नाटेकर म्हणाले, महाराष्ट्राच्या तुलनेत कोकणातील लोकांचे राहणीमान, बौद्धिक क्षमता, विकासाचे निकष यानुसार भाषावर प्रांतरचना करताना या सर्वांचा विचार करून वेगळ्या कोकण राज्याचा विचार करणे आवश्यक होते. मात्र, कोकणची कायम उपेक्षाच करण्यात आली. कोकणचा विकास करण्याची क्षमता असलेले वैज्ञानिक महामंडळ पश्चिम महाराष्ट्राच्या वाट्याला गेले. कोकणातील नैसर्गिक साधनसंपत्तीचा उर्वरित राज्याच्या विकासासाठी वापर करणारे शासन कोकणाच्या माथ्यावर प्रदूषणकारी प्रकल्प मारत आहे. सर्वांत जास्त नैसर्गिक संपत्ती असूनही कोकणच्या विकासाकडे दुर्लक्ष झाले. आतापर्यंतच्या सर्व मुख्यमंत्र्यांनी कायम पश्चिम महाराष्ट्राच्या विकासाकडे लक्ष दिले. राज्यात तसेच कोकणात आजही जी धरणे होऊ घातली आहेत, ती बॅ. ए. आर. अंतुले यांच्या रूपाने एक कोकणी माणूस मुख्यमंत्री झाल्याने शक्य झाले. यावेळी राजमाता सत्त्वशिलादेवी भोसले यांनीही मार्गदर्शन केले. (वार्ताहर) विद्यार्थ्यांनो, आंदोलनात सहभाग घ्या कोकणातील जागतिक दर्जाचे बंदर असताना त्याच्या विकासाकडे केंद्र व राज्य शासनाने कायम दुर्लक्ष केले. पूर्वी नोकऱ्यांमध्ये ८० टक्के कोकणच्या लोकांना स्थान असायचे. मात्र, आता हे प्रमाण पाच टक्क्यांपेक्षाही कमी झाले आहे. घटनेनुसार वेगळे कोकण राज्य होणे शक्य असतानाही शासन दुर्लक्ष करत आहे. त्यामुळे येत्या काळात स्वतंत्र कोकण राज्य निर्मितीसाठी तीव्र आंदोलन करण्यात येणार असून, स्वतंत्र कोकण राज्याच्या मागणीसाठी येथील विद्यार्थ्यांनी आंदोलनात मोठ्या संख्येने सहभाग घेण्याचे आवाहन प्रा. नाटेकर यांनी केले. ‘स्वतंत्र कोकण : काळाची हाक’ ‘स्वतंत्र कोकण : काळाची हाक’ निबंध स्पर्धेतील विजेत्या स्पर्धकांना यावेळी बक्षिसे देऊन गौरविण्यात आले. स्पर्धा दोन गटांत झाली. यामध्ये अरविंद वालावलकर, नीलेश मेस्त्री, विनय भांगले, आदींसह यशस्वी स्पर्धकांचा तसेच स्पर्धेत सहभागी ९२ स्पर्धकांचाही राजमातांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
भविष्यात ‘कोकण’ राज्यासाठी लढा
By admin | Published: September 22, 2016 12:41 AM