वेंगुर्ला : शिरोडा-वेळागर येथे जलक्रिडा अंतर्गत पॅरॉसिलिग व्यवसाय सुरू केल्याने या व्यवसायाचे मालक-कर्मचारी व या भागात मासेमारी करणारे मस्य व्यावसायिक यांच्यात व्यवसायावरून वाद होऊन एकमेकांस हाणामारी झाली. या प्रकरणी परस्परविरोधी तक्रारी नुसार एकूण २९ जणांवर वेंगुर्ला पोलीस स्टेशनमध्ये गुन्हे दाखल झाले आहेत. ही घटना काल, शुक्रवारी दुपारच्या सुमारास घडली.शिरोडा-वेळागर येथे घडलेल्या या घटनेबाबत रात्री उशीरा परस्पर विरोधी तक्रारी दाखल झाल्या. यात शिरोडा वेळागर येथे पर्यटन व्यवसायदृष्ट्या विविध जलक्रिडा व्यवसाय अंतर्गत पॅरॉसिलिगचा व्यवसाय शिरोडा बागायतवाडी येथील भालचंद्र नाईक हे करतात. सध्या पर्यटन हंगात सुरू झाल्याने पॅरॉसिलिग व्यवसाय नाईक यांनी सुरू केला होता. मात्र तो बंद करण्यासाठी रवि बटा, प्रकाश नार्वेकर अंकुश म्हाकले, हरेश बटा, मनोज उगवेकर, देवीदास कुबल, नुतन निकम, प्रेम नार्वेकर, कृष्णा चोपडेकर, आशिष पेडणेकर, विक्रम नार्वेकर यांनी जमाव करून ऑफिसकडे येत आपल्यासह आपल्या कर्मचा-यांना मारहाण केली. यासंबंधीची तक्रार वेंगुर्ले पोलिसांत नाईक यांनी दाखल केली आहे.मच्छिमार प्रेम नार्वेकर याच भागात अनेक वर्षे मासेमारी करतात. पॅरासिलिग या क्रिडा प्रकारामुळे मासे त्या भागातून दूर जातात. त्यामुळे मासेमारीला मासे मिळत नसल्याने मच्छिमारांचे आर्थिक नुकसान होते. त्यामुळे मासेमारी केल्या जाणा-या या भागात पॅरॉसिलिग हा क्रिडा प्रकार त्यांनी करू नये. यासाठी शासन स्तरावर व लोकप्रतिनीधींकडे मागणी केलेली आहे. पालकमंत्री उदय सामंत यांनी पॅरासिलिग बंद ठेवण्याच्या सुचनाही दिल्या होत्या. असे असताना तो व्यवसाय सुरू केल्याने व मच्छिमारीवर परिणाम होत असल्याने तो बंद ठेवण्यासाठी काही मच्छिमारी त्यांच्याकडे गेले असता पॅरॉसिलिग व्यवसायातील राजेश नाईक, प्रमोद नाईक, दत्तराज कोरगावकर, क्लीप्टन अफोसो, रूजारओ अफासो, विल्प्रेड, वैभव नाईक, गौरव उर्फ दादा साळगावकर, भालचंद्र नाईक, शालू अफासो व चार परप्रांतिय कामगार अशा चौदा जणांनी आम्हास मारहाण केली. अशी विरोधी तक्रार प्रेम नार्वेकर यांनी केली आहे.या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस निरीक्षक तानाजी मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक विनायक केसरकर हे करीत आहेत.
पॅरासिलिग व्यावसायीक, मच्छिमार यांच्यात हाणामारी, २९ जणांवर गुन्हे दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 04, 2021 6:52 PM