कणकवली : मुंबई गोवा महामार्ग चौपदरीकरणाचे काम दमदाटी करून रोखणाऱ्या तसेच कामात अडथळा आणणाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करा, अशी मागणी करणारे पत्र दिलीप बिल्डकॉन कंपनीकडून कणकवली पोलीस निरीक्षकांना देण्यात आले आहे.दरम्यान , पोलीस निरीक्षक शिवाजी कोळी यांनी दिलीप बिल्डकॉन कंपनीकडून पत्र आल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. तसेच पावसाळ्यापूर्वी महामागार्चे महत्वाचे काम पूर्ण होणे आवश्यक आहे.त्यामुळे त्यामध्ये कोणी विनाकारण अडथळा आणत असेल तर त्यांच्यावर गुन्हे दाखल करून कडक कारवाई करण्याच्या सूचना वरिष्ठांनी दिल्या असल्याचेही त्यांनी सांगितले.मुंबई गोवा महामागार्चे चौपदरीकरणाचे काम जोरदार सुरू आहे. मात्र काही व्यक्तींकडून ठेकेदार कंपनीच्या कामगारांना अधून मधून धमकाविण्याचा प्रकार घडत आहे. रात्री अपरात्री कामगारांना धमकाविण्याचे प्रकार वाढल्याने त्यांच्या मध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
काही कामगार काम सोडून पळून गेले आहेत. त्यामुळे पावसाळ्यापूर्वी महामागार्चे महत्वाचे काम पूर्ण करण्यात अडचणी निर्माण झाल्या आहेत. या पार्शवभूमीवर दिलीप बिल्डकाँन कंपनीने पोलिसांना पत्र दिले आहे.