आंबोली : आंबोली येथील हिरण्यकेशी फाट्यानजिक पुलाच्या कठड्यावरून रिक्षा पडून एका युवकाचा मृत्यू झाला होता. या प्रकरणाचा निषेध म्हणून आंबोलीत गुरूवारी काळ्या फिती लावून मोर्चा काढण्यात आला. तसेच उपोषण करण्यात आले. यावेळी आंदोलनकर्त्यांनी बांधकाम अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करावा तसेच मृताच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत द्यावी, अशा मागण्या केल्या आहेत. या मागण्यावर उशिरापर्यंत चर्चा सुरू होती. आमदार दीपक केसरकर यांनी या प्रकरणात आपण लक्ष घालू, असे आश्वासन दिल्यानंतर उपोषण मागे घेण्यात आले. आंबोली येथे चार दिवसांपूर्वी एक रिक्षा आंबोली बेळगाव मार्गावर असलेल्या पुलावरून खाली कोसळली. त्यात सुहास नाईक हा युवक मृत पावला. या घटनेनंतर आंबोलीतील ग्रामस्थांनी बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना घेराओ घातला. तसेच राज्यमंत्री दीपक केसरकर यांना निवेदनही दिले होते. मात्र, अद्यापपर्यंत कोणतीही कारवाई झालेली नाही.त्यामुळे आंबोलीच्या पंचायत समिती सदस्या रोहिणी गावडे, रिक्षा युनियन अध्यक्ष दिलीप सावंत, अमोल कोरगावकर, सुहास जोशी, उत्तम पारधी, संजय गावडे आदींनी आंबोली बाजारपेठेतून तोंडाला काळ््या फिती लावून मुक मोर्चा काढला. त्यानंतर आंबोली पोलीस ठाण्यासमोर उपोषण केले. यावेळी आंदोलनकर्त्यांनी बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करा तसेच मृताच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत देण्याच्या मागण्या केल्या. पोलीस निरीक्षक रणजित देसाई, सहाय्यक पोलीस निरीक्षक महेंद्र शेलार आदींनी आंबोली येथे जात आंदोलकांशी चर्चा केली. तसेच यावेळी बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनाही बोलावण्यात आले होते. (वार्ताहर)
दोषींवर गुन्हे दाखल करा
By admin | Published: December 18, 2014 9:52 PM