कसई-दोडामार्ग : कसई-दोडामार्ग नगरपंचायत निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याच्या गुरुवारच्या शेवटच्या दिवशी काँग्रेस - राष्ट्रवादी आघाडी, सेना भाजप युतीच्या पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी जोरदार शक्ती प्रदर्शन करीत आपले उमेदवारी अर्ज दाखल केले. मनसे, आरपीआय तसेच अपक्षांनीही आपले उमेदवारी अर्ज दाखल केले. नगरपंचायतीच्या १७ जागांपैकी एकूण ६० उमेदवारी अर्ज दाखल झालेले आहेत. यात काँग्रेस- १०, राष्ट्रवादी- ७, भाजप- ९, शिवसेना- ८, मनसे- ४ तर आर. पी. आय.- १ असे उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले असून अपक्षांची संख्या २१ एवढी आहे. कसई दोडामार्ग नगरपंचायत निवडणुकीतील १७ जागांसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची गुरुवारी शेवटची तारीख असल्याने सकाळपासूनच तहसीलदार कार्यालयासमोर उमेदवारांसह कार्यकर्त्यांनी गर्दी केली होती. दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास तहासील कार्यालयाच्या आवारात सर्वच राजकीय पक्षाचे पदाधिकारी व कायकर्ते आणि उमेदवारांनी केलेल्या गर्दीने अवघे शहर फुलून गेले होते. दोडामार्गातील ही पहिलीच निवडणूक भाजप- शिवसेना युतीच्या माध्यमातून लढविली जात असून भाजपला ९ तर शिवसेना ८ असा फॉर्म्युला निश्चित झाला. त्यानुसार उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले. यावेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष अतुल काळसेकर, माजी आमदार प्रमोद जठार, जिल्हा परिषद सदस्य राजेंद्र म्हापसेकर, तालुकाध्यक्ष रंगनाथ गवस, शिवसेनेचे तालुकाप्रमुख बाबुराव धुरी, गणेशप्रसाद गवस, पंचायत समिती सभापती महेश गवस, उपसभापती आनंद रेडकर, चेतन चव्हाण, राजेश प्रसादी, सुधीर पनवेलकर, पांडुरंग नाईक, आनंद तांबुळकर, संध्या प्रसादी, रेश्मा कोरगावकर, शाम चांदेलकरसह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. भाजपने ९ जागांसाठी ९ उमेदवार तर शिवसेनेने ८ जागांसाठी ८ उमेदवारी अर्ज निवडणूक अधिकारी यांच्याकडे सुपूर्द केले. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीच्या माध्यमातून ही निवडणूक लढवित असून राष्ट्रीय काँग्रेस - १० तर राष्ट्रवादी काँग्रेस- ७ जागा असा फॉर्म्युला निश्चित आहे. यावेळी राष्ट्रवादीचे सुरेश दळवी, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष गोपाळ गवस, महादेव बोर्डेकर, काँग्रेसचे सावंतवाडी तालुकाध्यक्ष संजू परब, दोडामार्ग तालुकाध्यक्ष प्रेमानंद देसाई, माजी तालुकाध्यक्ष राजेंद्र निंबाळकर, रमेश दळवी, दया धाऊसकर, एकनाथ नाडकर्णी, संतोष नानचे, वासूदेव नाईक आदी उपस्थित होते. सतरा जागांसाठी आघाडीमार्फत सर्व उमेदवारी अर्ज दाखलकेले. (प्रतिनिधी)मनसेकडून चार उमेदवारी अर्ज दाखल : अपक्षांमुळे निवडणुकीत रंगत येणारया निवडणुकीत मनसेने चार अर्ज दाखल केले आहेत. यावेळी मनसेचे उपजिल्हाध्यक्ष दत्ताराम गावकर, महिला उपजिल्हाध्यक्ष श्रेया देसाई, प्रभारी तालुका अध्यक्ष प्रभाकर गवस, दीपक देसाई आदी पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. या चार उमेदवारांमध्ये राष्ट्रवादीचे कट्टर कार्यकर्ते रामचंद्र ठाकूर व शिवसेनेचे युवा सेना प्रमुख जीवन सावंत यांचा समावेश आहे.शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी पक्षांमधील अनेक इच्छुक उमेदवारांचे पत्ते कट झाल्याने पक्षांत बंडखोरी वाढली आहे. एकनिष्ठ व प्रामाणिक कार्यकर्त्याला संधी न मिळाल्याच्या भावनेनेही बंडखोरी झाली आहे. तर भाजपामध्ये अजून तरी बंडखोरी झाल्याचे उदाहरण नाही. त्यामुळे या निवडणुकीत बंडखोरी व अपक्षांच्या उमेदवारीने रंगत येणार आहे.भाजपा व शिवसेनेकडून मानहानीपूर्वक बाहेरचा रस्ता मिळालेल्या आरपीआयमार्फत एकमेव अर्ज दाखल झाला. प्रभाग १२ मध्ये आरपीआयचे जिल्हा कार्याध्यक्ष गणपत जाधव यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी राज्य कार्यकारिणी उपाध्यक्ष रमाकांत जाधव, तालुकाध्यक्ष सखाराम कदम, दोडामार्ग शहराध्यक्ष नवराज कांबळे उपस्थित होते. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून विठ्ठल इनामदार काम पाहत आहेत. तर त्यांना तहसीलदार बी. व्ही. वरेरकर, संतोष जाधव, नायब तहसीलदार श्रीधर गालीपीले आदी सहकार्य करत आहेत.
शक्ती प्रदर्शनाने अर्ज दाखल
By admin | Published: October 09, 2015 1:17 AM