कणकवली : कणकवली नगरपंचायतीकडून लॉकडाऊनची अंमलबजावणी कडक करण्यात आली आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचा भंग केल्याप्रकरणी कणकवली बाजारपेठेतील एका कापड दुकानदारावर कणकवली पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. लॉकडाऊनची अंमलबजावणी करण्यासाठी मुख्याधिकारी अवधूत तावडे हे नगरपंचायतीच्या पथकासह सक्रिय झाले होते.कणकवली बाजारपेठेतील मनमंदिर हे कापड दुकान सुरू असल्याबाबत मिळालेल्या माहितीनुसार नगरपंचायत पथकाने तपासणी केली असता या कापड व्यावसायिकाकडून जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचा भंग केल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार भागीरथ धीराराम प्रजापती याच्यावर जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचा भंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत कणकवली पोलीस ठाण्यात नगरपंचायत कर्मचारी रमेश कदम यांनी तक्रार दाखल केली आहे.दरम्यान, कणकवलीचे नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी सोमवारी कारवाईचे संकेत दिले होते. त्यानंतर मंगळवारी सकाळपासूनच मुख्याधिकारी अवधूत तावडे हे स्वतः कणकवली शहरात तपासणीकरिता फिरत असताना नगरपंचायत कर्मचाऱ्यांनीही सक्रियपणे काम करण्यास सुरुवात केली होती.
मंगळवारी केलेल्या कारवाईत नगरपंचायतीच्या पथकांमध्ये रवी महाडेश्वर, प्रशांत राणे, संतोष राणे, रमेश कदम, सचिन तांबे यांचा समावेश होता, कणकवली पटवर्धन चौकात वाहतूक पोलीस संदेश आबिटकर, आरोग्य पथकात तेजस्वी पारकर, दिनेश जाधव, लक्ष्मण वळवी आदी उपस्थित होते.गुन्हा दाखल करणारज्या घरांमध्ये कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडला आहे. त्या घरातील व्यक्तीने नियमाप्रमाणे १४ दिवस क्वारंटाईन राहायचे आहे. अशा व्यक्ती जर शहरात फिरताना आढळल्या, तर त्यांच्यावरदेखील गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याचा इशारा मुख्याधिकारी अवधूत तावडे यांनी दिला आहे.