कणकवली : कणकवली पोलीस स्टेशनपासून हाकेच्या अंतरावर श्रीधर पार्कमधील ४ फ्लॅटस्, यमुना अपार्टमेंटमधील ३ फ्लॅटस्, कलमठ बिडयेवाडीतील भोसले रेसिडन्सीमधील १ फ्लॅट व पृथा अपार्टमेंटमधील १ फ्लॅट आणि एक देशी दारू दुकान फोडून अज्ञात चोरट्यांनी गुरूवारी मध्यरात्री खळबळ उडवून दिली. रोख रक्कम व ऐवज जरी चोरट्यांच्या हाती लागला नसला तरी या घटनेमुळे कणकवली परिसरात सर्वत्र भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलिसांनी या घटनेचा पंचनामा करून अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत पोलीसस्टेशन तसेच घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की, कणकवली ते आचरा रस्त्यालगत असलेल्या श्रीधर पार्क या बिल्डिंगमधील ४ बंद फ्लॅटस् चोरट्यांनी फोडले. त्यामध्ये सुनिल लब्धे, जयमाला मसुरकर, विष्णू आत्माराम परब, रमेश परब यांच्या फ्लॅटचा समावेश आहे. तर यमुना अपार्टमेंटमधील दिलीप राणे, पारकर, देसाई यांचे तीन फ्लॅट अज्ञातांनी फोडले आहेत.
या सात फ्लॅटमध्ये चोरीचा प्रयत्न झाल्याची तक्रार सेवानिवृत्त पोलीस कर्मचारी विष्णू आत्माराम परब यांनी कणकवली पोलीस स्टेशनमध्ये दिली आहे.त्याचप्रमाणे आचरा रोडवरील देशी दारूचे दुकान अज्ञात चोरट्यांनी फोडले. या दुकानातून ३५०० रूपयांची रक्कम गेल्याची चर्चा घटनास्थळी होती. मात्र दुकान मालकाने तक्रार नोंदविलेलीनाही. तसेच कलमठ बिडयेवाडी येथील भोसले रेसिडन्सीमधील एक फ्लॅट फोडण्यात आला असून त्यामधील पाच हजार रुपये चोरीला गेले आहेत.
दहा ठिकाणी चोरीचा प्रयत्न करण्यात आला आहे. तसेच श्रीधर पार्कच्या पार्किंगमधील काही दुचाकी चोरण्याचा प्रयत्न अज्ञात चोरट्यांनी केला आहे. पोलीस स्टेशनच्या परिसरातच चोरट्यांनी चोरी केल्याने परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. या प्रकरणाचा अधिक तपास कणकवली पोलीस करीत आहेत. दरम्यान, या चोरीच्या घटनेमुळे सर्वत्र खळबळ उडाली असून चोरट्यांना पकडण्याचे आव्हान पोलिसांसमोर उभे ठाकले आहे.सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे तोंड फिरवलेअज्ञात चोरटे सराईत असून चोरी करण्यापूर्वी त्या अपार्टमेंट परिसरात असलेले सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे तोंड वर करून ठेवले़ले होते. तसेच चित्रमंदिर परिसरात असलेले कॅमेºयांमध्ये दिशा बदल केल्याचे पोलिसांनी सांगितले. पोलिसांच्या तपासाला मदत होऊ नये म्हणून चोरट्यांनी ही नवी युक्ती वापरली आहे. त्याचबरोबर अपार्टमेंटमधील दरवाजा फोडण्यासाठी लांब सळईचा वापर करण्यात आला आहे. अनेक फ्लॅटमधील कपाटे फोडून ऐवज लंपास करण्याचा चोरट्यांचा इरादा होता. मात्र त्यांना त्यात यश आलेले नाही.